एसटी बसची चाके थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 11:48 PM2017-10-17T23:48:51+5:302017-10-17T23:49:23+5:30
सातव्या वेतन आयोगासह विविध मागण्यांसाठी सोमवारी मध्यरात्रीपासून परिवहन महामंडळाच्या चालक, वाहकांसह कर्मचाºयांनी बेमुदत बंद पुकारल्याने जिल्हाभरातील आगारांतून एकही बस धावली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती/परतवाडा : सातव्या वेतन आयोगासह विविध मागण्यांसाठी सोमवारी मध्यरात्रीपासून परिवहन महामंडळाच्या चालक, वाहकांसह कर्मचाºयांनी बेमुदत बंद पुकारल्याने जिल्हाभरातील आगारांतून एकही बस धावली नाही. परिणामी हजारो प्रवाशांंचे हाल झाले, तर खासगी ट्रॅव्हल्स चालकांची बल्ले बल्ले झाली.
राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटी बसची चाके थांबल्याचा फटका शहरासह ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. दरम्यान, परतवाडा येथे संपाचे चित्रीकरण करणाºया अज्ञात छायाचित्रकाराने कुणासाठी चित्रीकरण करीत असल्याची माहिती न दिल्याने संतप्त कर्मचाºयांनी त्याला चोप देत पिटाळून लावल्याने थोडा वेळ तणाव निर्माण झाला होता. अमरावती आगारातून दिवसभरात एकही बस बाहेर पडली नाही. त्यामुळे बस स्थानकासमोरूनच प्रवासी वाहतुकीला खासगी वाहतूकदारांना वाव मिळाला. त्यांनी अव्वाच्या सव्वा दर आकारून प्रवाशांची अक्षरश: लूट केली. बाहेरगावाहून आलेल्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. दिवाळीनिमित्त घरी परतणाºयांना एसटी बंदचा फटका बसला. जिल्ह्यात एकूण आठ आगार असून, सुमारे ४०० बस आहेत. ग्रामीण भागात सर्वात मोठे परतवाडा आगार असून, येथून परिवहन महामंडळाच्या ७८ बसगाड्यांद्वारे ३५० फेºया करण्यात येतात. दररोज किमान सहा लाख रुपये उत्पन्न मिळते. आगारात चालक, वाहक व मेकॅनिक असे जवळपास ४०० कर्मचाºयांनी बेमुदत संपात सहभाग घेतला आहे.
अमरावती आगारातून दरदिवसाला ११०० बसेस धावतात. दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात आहे. मंगळवारी एका दिवसाचे २५ लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागल्याची माहिती अमरावती बस स्थानक प्रबंधक उमेश इंगळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
काळी-पिवळी जोरात
मंगळवारी एसटी बसची चाके थांबल्याचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागात काळी-पिवळी टॅक्सीचालकांनी घेतला आहे. दिवाळीनिमित्त खरेदीसाठी शहरात येणाºयांनी मोठी गर्दी केली होती. ही गर्दी काळी-पिवळी चालकांनी ‘कॅश’ केली.
मागण्यांसाठी संपकरी चालक, वाहक, कर्मचारी आक्रमक दिसून आले. ३ अधिकारी वगळता परतवाडा आगारातील कर्मचारी संपावर गेल्याची माहिती आगारप्रमुख अनिकेत बल्लाळ यांनी दिली.
ग्रामीणसह शहरी
भागात कोंडी
परतवाडा आगारातून प्रत्येकी १५ मिनिटाने अमरावतीसाठी बस असून, अकोला, नागपूर, होशंगाबाद, खंडवा, भैसदही व जिल्हाभरातील तालुक्यांत बसफेºया जातात. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात फेºया असल्याने सोमवारी संपामुळे प्रवाशांना खासगी वाहनांतून प्रवास करावा लागला. मात्र, खासगी वाहनांची संख्या अल्प असल्याने हजारो प्रवाशांंना त्याचा फटका बसला.