मेळघाटच्या दरीत एसटी कोसळली
By admin | Published: April 25, 2015 12:18 AM2015-04-25T00:18:23+5:302015-04-25T00:18:23+5:30
परतवाडा आगाराची बस तालुक्यातील रुईपठारवरून परतवाडा येथे शुक्रवारी सकाळी ११ वाजता येत असताना घटांग नजीकच्या शंभर फूट खोल दरीत कोसळली.
ब्रेक फेल : ३१ जखमी, सहा गंभीर, भंगार गाड्यांचा जीवघेणा प्रवास
नरेंद्र जावरे चिखलदरा
परतवाडा आगाराची बस तालुक्यातील रुईपठारवरून परतवाडा येथे शुक्रवारी सकाळी ११ वाजता येत असताना घटांग नजीकच्या शंभर फूट खोल दरीत कोसळली. यात जवळपास २८ प्रवासी जखमी झाले असून सहा गंभीर जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
परतवाडा आगाराची बस एमएच ४० - ८५२६ रुईपठार येथे रात्री मुक्कामी होती. शुक्रवारी सकाळी ८ वाजता रूईपठार येथून निघालेली ही बस रस्त्यावरील गावात असलेल्या प्रवाश्यांना घेऊन परतवाड्याकडे निघाली होती. चालक संतोष थोरात यांचे अचानक बसवरील नियंत्रण सुटल्याने बस जवळपास १०० फूट खोल दरीत जावून कोसळली. यात दरीतील झाडांना अडकत खाली थांबली. बसमधील प्रवासी लोंबकळत फेकल्या गेले. अपघात एवढा गंभीर होता की, बसच्या समोरील भागाचा चुराडा झाला. तर वृत्त लिहिस्तोवर गंभीर जखमींची प्रकृतीसुद्धा धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकिय सूत्रांनी सांगितले.
पोलिसांची तत्परता, गुन्हा दाखल
घटनास्थळी कर्मचाऱ्यांसह ठाणेदार एन. एन. गवारे, सहा. पोलीस उपनिरीक्षक जी. एस. शिंदे, वाहतूक शिपाई शे. जमील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जावून जखमींना बाहेर काढले. वृत्त लिहीस्तोवर चिखलदरा पोलीस स्टेशनला चालकाविरुद्ध भादंविच्या २७९, ३३७, ३३८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले.