एसटी वाहकाने संसाराच्या गाडीत दुसरीला बसवले, पहिलीची पोलिसात धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2022 03:25 PM2022-05-05T15:25:16+5:302022-05-05T15:35:39+5:30
२०१६ पासून पतीने एकदाही मुलांची भेट घेतलेली नाही, तसेच त्याचे दुसरे लग्न झाल्याची माहिती मिळाल्याने जानेवारी २०२२ मध्ये महिलेने तक्रार नोंदविण्यासाठी तळेगाव दशासर पोलीस ठाणे गाठले.
तळेगाव दशासर (अमरावती) : एसटी महामंडळात पुजगाव आगारात कार्यरत व अमरावती येथे राहणाऱ्या ३४ वर्षीय तरुणाने अमरावती येथे परस्त्रीसोबत लग्न करून संसार थाटला असल्याची तक्रार त्याच्या पत्नीने तळेगाव दशासर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, महिलेचे २००५ मध्ये नागसेन राजहंस तायडे (३४) याच्याशी लग्न झाले होते. २००७ मध्ये त्याला वाहक म्हणून नोकरी लागली. त्यांना १४ व ११ वर्षांची दोन मुले आहेत. २०१६ पासून पतीने परस्त्रीशी संबंध प्रस्थापित केले. यानंतर माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ सुरू झाला. सासरे राजहंस सदाशिव तायडे व सासूदेखील यात सहभागी असल्याचे तक्रारीत नमूद आहे. २०१६ पासून पतीने एकदाही मुलांची भेट घेतलेली नाही, तसेच त्याचे दुसरे लग्न झाल्याची माहिती मिळाल्याने जानेवारी २०२२ मध्ये महिलेने तक्रार नोंदविण्यासाठी तळेगाव दशासर पोलीस ठाणे गाठले.
पोलिसांनी हे प्रकरण अमरावती येथील भरोसा सेलला दिले. मात्र, नागसेन तारखेवर आला नाही. यामुळे हे प्रकरण तळेगाव दशासर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले. तळेगाव पोलिसांनी नागसेन तायडे, राजहंस तायडे व एक महिला (सर्व रा. अमरावती) यांच्याविरुद्ध ४ मे रोजी गुन्हा नोंदविला.