ट्रकचालकांच्या संपामुळे एसटी भोपाळमध्ये अडकली; आंतरराज्य वाहतूक खोळंबली, १० फेऱ्या विस्कळीत
By जितेंद्र दखने | Published: January 1, 2024 05:51 PM2024-01-01T17:51:56+5:302024-01-01T17:53:34+5:30
हीट ॲण्ड रण कायद्या विरोधात खासगी वाहतुक करणाऱ्या चालकांनी आंदाेलन सुरू केले आहे.
अमरावती: केंद्र सरकारने अपघाताबाबत बनवलेला कायदा अन्यायकारक असल्याने ट्रक व अन्य खासगी वाहन चालकांनी संप पुकारला असून ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन सुरू केले आहे. याचा फटका राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसनाही बसला आहे.अमरावती विभागातून आंतरराज्य वाहतुक करणाऱ्या १० फेऱ्यांची वाहतुक यामुळे खोळंबली आहे. तर अमरावती येथून भोपाल येथे पोहोचलेली एसटी बस मात्र या आंदोलनामुळे अडकल्याची माहिती महामंडळाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली.
अमरावती विभागातून दररोज अमरावती खंडवा, इंदौर, बऱ्हाणपूर, मुलताई, छिंदवाडा, भोपाळ, बैतुल या मध्यप्रदेशातील आदी ठिकाणी एसटी बसेसव्दारे प्रवाशी वाहतुक केली जाते. अशातच केंद्र सरकारच्या हीट ॲण्ड रण केसेस कायद्यांतर्गत अपघात झाल्यानंतर ड्रायव्हरला दहा वर्ष शिक्षा व ७ ते १० लाखापर्यंत दंड या कायद्या अंमलात आणण्याचा निर्णय घेतल आहे. मात्र हा कायदा हा चालकांवर अन्याय करणारा त्यामुळे हा कायदा केंद्र शासनाने त्वरील रद्द करावा ट्रक चालक,मालक तसेच अन्य खासगी वाहन चालकांनी १ जानेवारी पासून संप पुकारत आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या आंतरराज्य वाहतुक फेऱ्या या आंदोलनामुळे विस्कळीत झाल्या आहेत. परिणामी अमरावती विभागामधून मध्यप्रदेशात जाणाऱ्या जवळपास १० फेऱ्या विस्कळीत झालेल्या आहेत. परिणामी एसटी महामंडळाने या एसटी बसेसच्या फेऱ्या जिल्हातंर्गत फेऱ्यामध्ये वळविल्याची माहिती एसटी महामंडळाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली. केवळ अमरावती ते भोपाल ही बस फेरी रास्तरोको आंदोलनामुळे भोपाल येथे रोखण्यात आली आहे.
हीट ॲण्ड रण कायद्या विरोधात खासगी वाहतुक करणाऱ्या चालकांनी आंदाेलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे एसटी महामंडळाच्या अमरावती विभागातून मध्यप्रदेशात जाणाऱ्या फेऱ्याच विस्कळीत झाल्या आहेत. यामुळे या फेऱ्या जिल्हातंर्गत वाहतुकीसाठी वळविल्या आहेत. इतर सर्व वाहतुक सुरळीत सुरू असून महामंडळाचे कुठलेही आर्थिक नुकसान झालेले नाही. - योगेश ठाकरे, प्रभारी विभागीय वाहतुक अधिकारी, रा.प.म.अमरावती विभाग