खासगी वाहनांचे टायर एसटी करणार रिमोल्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 11:44 AM2020-08-06T11:44:05+5:302020-08-06T11:46:14+5:30
एसटीचा टायर पुन:स्तरीकरण (रिमोल्ड) प्रकल्प जिल्ह्यात कार्यान्वित आहे. या प्रकल्पातून आता खासगी, शासकीय व निमशासकीय परिवहन संस्थांच्या वाहनांचे टायर रिमोल्ड करून देण्यात येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाला आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागत आहे. यातून सावरण्यासाठी एसटी महामंडळातर्फ अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. एसटीचा टायर पुन:स्तरीकरण (रिमोल्ड) प्रकल्प जिल्ह्यात कार्यान्वित आहे. या प्रकल्पातून आता खासगी, शासकीय व निमशासकीय परिवहन संस्थांच्या वाहनांचे टायर रिमोल्ड करून देण्यात येणार आहेत.
महामंडळाची संचालक मंडळाच्या २४ जुलै रोजी झालेल्या २९ व्या सभेत सर्व टायर पुन:स्तरीकरण सयंत्रामध्ये शिल्लक उत्पादन क्षमतेचा वापर करून इतरांना टायर पुन:स्तरीकरण करून देण्याबाबत आलेल्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. अमरावती येथे विद्यापीठ मार्गावर एसटी महामंडळाचा टायर पुन:स्तरीकरण प्रकल्प कार्यान्वित आहे.
कोरोनामुळे एसटी महामंडळाचा प्रवासी वाहतूकरूपी उत्पन्नाचा स्रोत बंद आहे. यामुळे उत्पन्नवाढीसाठी एसटी महामंडळाने आता नवनवीन उपक्रम सुरू केले आहेत. त्यात ही सुविधा देण्यात आली आहे. त्यावर नियंत्रणासाठी विभागीय पातळीवर विभाग नियंत्रक यांच्या नियंत्रणाखाली उपयंत्र अभियंत्यांची समिती गठित करण्यात आली आहे.
एसटी बसेस सुरू झाल्या असल्या तरी प्रवाशांचा प्रतिसाद अल्प असल्याने महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे महामंडळाने मालवाहतूक व आता टायर रिमोल्ड करून देण्याचाही निर्णय घेतला आहे.
- श्रीकांत गभणे,
विभाग नियंत्रक, अमरावती