‘सरल’च्या धर्तीवर पटपडताळणी
By admin | Published: October 27, 2015 12:30 AM2015-10-27T00:30:10+5:302015-10-27T00:30:10+5:30
राज्यातील १ ते १२ वीपर्यंतचे विद्यार्थी, शाळा आणि शिक्षकांची माहिती संकलित करण्यासाठी ‘सरल’ प्रणाली अवलंबविल्या गेली.
समितीची प्रत्यक्ष भेट : व्यवस्थापनाचे सहकार्य
अमरावती : राज्यातील १ ते १२ वीपर्यंतचे विद्यार्थी, शाळा आणि शिक्षकांची माहिती संकलित करण्यासाठी ‘सरल’ प्रणाली अवलंबविल्या गेली. या प्रणालीच्या यशस्वीतेच्या पार्श्वभूमिवर विभागातील महाविद्यालयांची पटपडताळणी होणार आहे. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ही मोहीम हाती घेतली असून विभागाकडून गुप्तता बाळगल्या जात आहे. शाळांमधील पटमोजणी संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरली होती. त्या अनुषंगाने महाविद्यालयातील मुलभूत, शैक्षणिक सुविधा आणि इतर बाबींची तपासणी मोहिम राबविताना कोणताही गाजावाजा होणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या आणि सर्व प्रकारच्या महाविद्यालयांमध्ये ही मोहीम राबविली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. बनावट विद्यार्थी संख्या दाखवून शिष्यवृत्तीसह अनुदान लाटण्याचे प्रकार राज्यात अनेक ठिकाणी उघड झाले. त्यावर चाप लावण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आल्याचेही उच्च व तंत्र शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले. मात्र याबाबत विद्यापिठाला अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे एक समितीदेखील प्रत्येक महाविद्यालयाला प्रत्यक्ष भेट देऊन वर्ग आणि वेळापत्रक जाणून घेत आहेत.