कर्मचारी आक्रमक; एसटी बसची चाके थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2021 05:00 AM2021-10-29T05:00:00+5:302021-10-29T05:00:55+5:30
अमरावती आगारात एसटी कामगार संघटनेचे अस्लम खान, मोहित देशमुख, एसटी कामगार सेनेचे बाळासाहेब राणे, शक्ती चव्हाण, जयदीप घोडे, एसटी कर्मचारी काँग्रेसचे प्रवीण चरपे, जयंता मुळे, महाराष्ट्र एसटी मोटार कामगार संघ शशिकांत खरबडे, गणेश तायडे, कास्ट्राईब रा. प. कर्मचारी संघटनेचे पंकज डोंगरे, राजेंद्र माहोरे, महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे अनिल मोहनकर, रूपराव इंगोले व अन्य कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरण करणे, १५ हजार रुपये बोनस, नियमित वेतन, करारानुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता आदी मागण्यांसाठी एसटी (राज्य परिवहन) कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर बुधवार सकाळी ५ वाजतापासून बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे. या मागण्यांची तत्काळ दखल न घेतल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत गुरुवारी काम बंद केल्यामुळे महामंडळाच्या जिल्ह्यातील आठही आगारांमधील ३५० हून अधिक बसची चाके थांबली आहेत. वाहतूक बंद असल्यामुळे प्रवाशांनाही गैरसोयीचा सामना करावा लागला.
अमरावती आगारात एसटी कामगार संघटनेचे अस्लम खान, मोहित देशमुख, एसटी कामगार सेनेचे बाळासाहेब राणे, शक्ती चव्हाण, जयदीप घोडे, एसटी कर्मचारी काँग्रेसचे प्रवीण चरपे, जयंता मुळे, महाराष्ट्र एसटी मोटार कामगार संघ शशिकांत खरबडे, गणेश तायडे, कास्ट्राईब रा. प. कर्मचारी संघटनेचे पंकज डोंगरे, राजेंद्र माहोरे, महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे अनिल मोहनकर, रूपराव इंगोले व अन्य कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले.
खासगी वाहनांचा आधार
एसटी कर्मचारी संघटनांच्या आंदोलनामुळे अमरावती, बडनेरा, दर्यापूर, परतवाडा, मोर्शी, वरूड, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे या आठ आगारातील एसटी बस आगारातच उभ्या होत्या. परिणामी प्रवाशांना खासगी वाहनांना आधार घेऊन प्रवास करावा लागला. विशेष म्हणजे, कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे एसटी महामंडळाचेही लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
वार्षिक वेतनवाढ, वेतन एक तारखेला झाले पाहिजे. एसटी महामंडळात समावेश, २८ टक्के डीए, घरभाडे भत्ता आदी मागण्यांसाठी एसटी कामगारांच्या विविध संघटनांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत मागण्या मंजूर होणार नाहीत, तोपर्यत आंदोलन सुरू ठेवले जाईल. या आंदोलनाला सर्व कर्मचाऱ्यांनी सहभागी झाले आहेत.
- मोहित देशमुख, एसटी कामगार संघटना
एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी एसटी कामगार कृती समितीने बेमुदत उषोषण सुरू केले आहे. अशातच न्यायिक मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ काम बंद केले आहे. प्रवाशांची गैरसोय झाल्याबद्दल याचा आम्हालाही खेद आहे. शासनानेही एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेऊन न्याय द्यावा.
- बाळासाहेब राणे, विभागीय अध्यक्ष, एसटी कामगार सेना
वरुडात खासगीची चांदी
वरूड : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चालक-वाहक व कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गुरुवारी वरूड स्थानकातून एकही बस बाहेर पडली नाही. प्रवाशांना त्रास सहन करावा लागला, तर खासगी वाहतूकदारांनी ही संधी लुटली.
बडनेरा आगारासमोर कर्मचाऱ्यांचे उपोषण
बडनेरा : संयुक्त आंदोलन कृती समितीच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी बडनेरा डेपोसमोर उपोषण केले. संयुक्त कृती समितीचे चंद्रशेखर पवार, अनिल इसळ, अशोक शेवतकार, विजय लाऊत्रे, मनीष देशमुख, दीपक दाडे, निलेश नाचणकर, विकास नागदिवे, मोहन उके, राहुल रंगारी आदी उपोषणाला बसले होते.
मोर्शीत एसटी कर्मचाऱ्यांचे उपोषण
मोर्शी : एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मोर्शी बस स्थानकासमोर संयुक्त आंदोलन कृती समितीने उपोषण थाटले आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे मोर्शी आगार अध्यक्ष शेळके, सचिव नीलेश गुडधे, महाराष्ट्र एसटी कामगार सेना आगार अध्यक्ष नि.प्र. जुमडे, व्ही.आर. जावरकर, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे आगार अध्यक्ष श्री.स. दाऊदपुरे, ए.जी. पांडे, कास्ट्राईब रा.प. कर्मचारी संघटनेचे व्ही. सी. पवार, आनंद राठोड, छाया बरडे, पवार आदी उपस्थित होते.
महागाई भत्ता वेतनवाढीची मागणी
दर्यापूर : स्थानिक आगारातील चालक-वाहक संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात बेमुदत उपोषण करीत आहेत. एसटी कामगार संघटना, एसटी कामगार सेना संघटना, एसटी कामगार कास्ट्राईब संघटना, एसटी कामगार काँग्रेस संघटना यांची मोट आंदोलनाने बांधली आहे. आगारात दाखल झालेल्या अकोट बसफेरीच्या चालक-वाहकांची हुर्यो उडविण्यात आली.