सीईओंसह कर्मचारी सायकलने पोहोचले ‘मिनी मंत्रालया’त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:18 AM2020-12-05T04:18:54+5:302020-12-05T04:18:54+5:30
अमरावती: स्वत:चे आरोग्य निरोगी ठेवण्यासोबतच पर्यावरणाचे संवर्धन आणि इंधन बचतीच्या उद्दिष्टासाठी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी ...
अमरावती: स्वत:चे आरोग्य निरोगी ठेवण्यासोबतच पर्यावरणाचे संवर्धन आणि इंधन बचतीच्या उद्दिष्टासाठी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालय सायकलने गाठले. इंधनचलित दुचाकी प्रवेशद्वारावर रोखण्यात आल्या. अशा कर्मचाऱ्यांना प्रवेशाकरिता मज्जाव करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात ‘माझी वसुंधरा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे आग्रही आहेत. यामुळेच जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना सायकलचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले. या उपक्रमाची शुक्रवारपासून अंमलबजावणी करण्यात आली. सकाळी ९.३० ते १० च्या सुमारास बहुतांश अधिकारी व कर्मचारी सायकलने कार्यालयात दाखल झाले.
मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे हे त्यांच्या कांतानगर स्थित शासकीय बंगल्यापासून जिल्हा परिषदेत पोहोचले. त्यांचे पोलीस गार्डसुद्धा सायकलने आलेत. याशिवाय उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाळे,प्रशांत थोरात, कॅफो चंद्रशेखर खंडारे, दत्तात्रय फिसके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय राहाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रेवती साबळे यांच्यासह अनेक कर्मचारी सायकलने कार्यालयात दाखल झाले. झेडपी सुरू केलेल्या सोमवार व शुक्रवार असे दोन दिवस सायकलने येण्याच्या आवाहनाला जवळपास ४० टक्के प्रतिसाद मिळाला आहे. विशेष म्हणजे, काही महिला अधिकारी व कर्मचारी तसेच निवृत्तीकडे झुकलेले कर्मचारी सायकलने आल्याचे दिसून आलेत. काही खातेप्रमुखांनी पायी येणे पसंत केले. काही दिव्यांग कर्मचाऱ्यांनी सायलकने कार्यालय गाठले.
बॉक्स
सायकलचा निर्णय ऐच्छिक
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आठवड्यातील दोन दिवस सायकलणे येणे बंधनकारक केले होते. मात्र, कमर्चारी युनियनचे अध्यक्ष पंकज गुल्हाने यांनी या निर्णयात काही कर्मचाऱ्यांना सवलत देण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता महिला अधिकारी, कर्मर्ऱ्यांना सायकलने येणे ऐच्छिक केले. दिव्यांग, कर्मचारी, गंभीर आजारी,१० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर राहणाऱ्यांना सूट देण्यात आली आहे.
बॉक्स
वेतनानंतर घेऊ सायकल
जिल्हा परिषदेत उपक्रमाच्या अंमलबजावणीच्या पहिल्या दिवशी काही कर्मचारी दुचाकी, ऑटोरिक्षाने आले. या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असता, अनेकांनी वेतन होताच सायकल खरेदी करू, असे सांगितले.
कोट
सायकल चालविणे हा चांगला व्यायाम आहे. आरोग्य, पर्यावरण संवर्धनाचा संदेश या उपक्रमातून जात आहे. दोन दिवस सायलकने कार्यालयात येण्याबाबत सूचना दि्ल्या आहेत. त्याला चांगला प्रतिसाद अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने मिळाला आहे.
अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी