सीईओद्वारा कर्मचाऱ्यांची झाडाझडती
By admin | Published: August 25, 2016 12:04 AM2016-08-25T00:04:09+5:302016-08-25T00:04:09+5:30
जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्यकार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांनी बुधवारी सामान्य प्रशासन विभागात पोहचून ....
थेट संवाद : कामकाजाची जाणून घेतली माहिती
अमरावती: जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्यकार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांनी बुधवारी सामान्य प्रशासन विभागात पोहचून त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतलीे. कोणाकडे कोणती जबाबदारी हे जाणून घेताना अनेक कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली.
ग्रामीण भागाच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या विविध विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. स्थानिक स्वराज संस्थेच्या प्रशासकीय कामांचा व्यापही तेवढाच मोठा आहे. त्यामुळे अनेक प्रकारची प्रशासकीय कामे जिल्हा परिषदेचे प्रमुख म्हणून मुख्यकार्यकारी अधिकारी यांना करावी लागतात. त्यामुळे प्रत्येक विभागाची प्रशासकीय माहिती प्रशासन चालविताना जास्तीत जास्त असल्यास काम करणे सुध्दा अधिक सोपे होते. एवढेच नव्हे तर ज्या प्रशासकीय कामाची जबाबदारी कर्मचारी सांभाळतात त्यांची व्यक्तिश: ओळख, नाव, कर्तव्याची माहिती असल्यास प्रशासकीय कामकाज सुलभ होवून नागरिकांचीही कामेही वेळेत होवू शकतात. नेमकी हीच बाब हेरून सीईओ कुलकर्णी यांनी सामान्य प्रशासन विभागात आकस्मिक भेट देऊन तेथे कार्यरत कर्मचाऱ्यांना एकत्र बोलवून प्रत्येक कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला. कार्यरत कर्मचाऱ्यांची प्रशासकीय कामाची गतीमानता तपासण्यासाठी सीईओंनी एका कर्मचाऱ्यास चक्क वरूड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कोण? असा प्रश्न विचारला आणि त्याच्या वेतनाची डायरी किती वेळात दाखवू शकता? असा प्रश्न या कर्मचाऱ्याला केला. लगेच डायरी आणण्याचे फर्मान त्यांनी सोडले. क्षणात सदर कर्मचाऱ्यानेही कपाटातील बीडीओंची डायरी आणून सीईओंने घेतलेली ही परीक्षा उत्तीर्ण केली. कर्मचाऱ्यांसोबत थेट संवाद साधल्यानंतर सीईआेंंनी काही महत्वाच्या सूचना करून नागरिकांची तसेच सर्व प्रकारची कामे गतीने करण्यासाठी महत्वाच्या सूचना देऊन त्यांची दर आठवडयाला खातेप्रमुखांनी बैठक घ्यावी. या बैठकींना मी सुध्दा एखाद्या वेळी उपस्थित राहून कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करेल, असा मानस त्यांनी व्यक्त केला. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रकाश तट्टे उपस्थित होते. सीईओंचा थेट संवाद पाहून कर्मचाऱ्यांचा सुरूवातीचा पडलेला चेहरा त्यांच्या प्रशासकीय मार्गदर्शनंतर उत्साहवर्धक दिसून आला. सीईओंची समन्वयातून काम करण्याची पध्दत असल्याचे दिसून आले.(प्रतिनिधी)