प्रशिक्षणाला दांडी; ४२४ कर्मचाऱ्यांवर कारवाई अटळ
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: April 16, 2024 11:14 PM2024-04-16T23:14:18+5:302024-04-16T23:15:29+5:30
लोकसभा निवडणूक : संबंधित अधिकाऱ्यांना बजावणार ‘एआरओ’ नोटीस
अमरावती : लोकसभा निवडणुकीसाठी १२ हजार कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण सुरू झालेले आहे. यामध्ये प्रशिक्षणाला ४२४ कर्मचारी अनुपस्थित राहिले आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांवर संबंधित एआरओमार्फत नोटीस बजावण्यात येणार आहे व खुलासा उचित न वाटल्यास ‘त्या’ कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघातील २६७२ मतदान केंद्रांमध्ये २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर एक मतदान केंद्राध्यक्ष व दोन मतदान अधिकारी आवश्यक असते. याशिवाय १५ ते २० टक्के कर्मचारी राखीव असतात. अशा प्रकारे ९७३० पुरुष व २२९३ महिला अशा एकूण १२,०२३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यामध्ये विविध कारणांमुळे इलेक्शन ड्यूटी रद्द करण्यासाठी साधारणपणे ११०० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अर्ज केलेले आहेत.