धारणीत प्रशिक्षणाच्या नावाखाली दांडी मारण्याचा फंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 10:44 PM2018-03-11T22:44:28+5:302018-03-11T22:44:28+5:30
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या मनमानी कारभाराला गटशिक्षणाधिकाऱ्यांकडूनच खतपाणी घातले जात असल्याने येथील गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
आॅनलाईन लोकमत
धारणी : जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या मनमानी कारभाराला गटशिक्षणाधिकाऱ्यांकडूनच खतपाणी घातले जात असल्याने येथील गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दुर्गम व अतिदुर्गम शाळेतील शिक्षक प्रशिक्षणाच्या नावाखाली आळीपाळीने कर्तव्य बजावून शाळा उघडण्याचे सोपस्कार पार पाडतात. मुख्यालयातील व तालुक्याच्या जवळपासच्या शिक्षकांनी नवीनच तंत्राचा वापर केला आहे.
सध्या केंद्र शाळानिहाय शिक्षकांना विविध विषयांचे प्रशिक्षण दिले जात आहे. प्रत्येक शाळेतील शिक्षकांना गुरूवार, शुक्रवार व शनिवार असे तीन दिवस प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी गुरुवार व शुक्रवारी १०.३० ते ५, तर शनिवारी सकाळी ७.३० ते ११ असे शालेय वेळापत्रकाप्रमाणे ठरविण्यात आले आहे. यासाठी निवड झालेल्या शिक्षकांना शाळेत जाण्यापासून सूट मिळते. प्रशिक्षण स्थळी चहा, नाश्ता व जेवणाची सुविधा केली जाते. मात्र, या प्रशिक्षणाला बहुतांश शिक्षक दांडी मारतात. शाळांमध्येही अनेक शिक्षक केवळ स्वाक्षरी करून गायब होत असल्याचे चित्र आहे. शनिवारीही स्वाक्षरी करून गावाकडे निघण्याचा सपाटाच शिक्षकांनी लावला. प्रस्तुत प्रतिनिधीने तालुक्यातील जुटपानी, बारू, बिजुधावडी, माणसुधावडी, गडगा मालूर, झिलांगपाटी, तातरा, मोगर्दा या शाळांना सकाळी ८ ते १०.३० दरम्यान भेटी दिल्या असता, या शाळांतील अर्धे शिक्षक बेपत्ता होते. शिक्षकच येत नसल्याने विद्यार्थीही दांड्या मारण्यात पटाईत झाल्याचे दिसून आले. एका वर्गात दोन ते चार विद्यार्थीच दिसले.
गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून मिळते साचेबद्ध उत्तर
पं.स. गटशिक्षणाधिकारी यांचे शिक्षणाकडे दुर्लत सतत होत असते. तक्रारींवर कारवाई ऐवजी ‘समायोजन’ करण्याकडेच त्यांचे प्राधान्य असते. यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता, ‘मी चौकशी करतो’ असे नेहमीचे साचेबद्ध उत्तर मिळाले.
शनिवार व सोमवारी हमखास दांडी
तालुक्यातील जि. प. शाळेतील आठवड्यातील पहिला दिवस व शेवटच्या दिवशी शिक्षकांची उपस्थिती नगण्य असते. सोमवारी उशिरा शाळेत पोहोचणे व शनिवारी जमल्यास दांडी मारणे किंवा लवकर निघून जाणे हा क्रमच ठरला आहे. याकडे केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी व गटविकास अधिकारी यांचे कमालीचे दुर्लक्ष असून, नुकसान गरीब विद्यार्थ्यांना होत आहे.