रूपेरी पडद्यावरील स्टार झाली खासदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 01:18 AM2019-05-25T01:18:53+5:302019-05-25T01:19:29+5:30
दाक्षिणात्य चित्रपटात यशस्वी कारकीर्द करणाऱ्या नवनीत राणा यांची खासदारकीपर्यंतची वाटचाल आव्हानात्मक व महिलांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
दाक्षिणात्य चित्रपटात यशस्वी कारकीर्द करणाऱ्या नवनीत राणा यांची खासदारकीपर्यंतची वाटचाल आव्हानात्मक व महिलांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.
दहा वर्षांपासून आमदार असलेले रवि राणा हे मनमिळावू व्यक्तिमत्त्व. त्यांच्या जडणघडणीतून नवनीत यांचे सामाजिक व्यक्तिमत्त्व फुलले. जनसामान्यांच्या व्यथेशी राणा दाम्पत्याची नाळ जुळलेली आहे. घरात त्यामुळेच जनसामान्यांचा सदान्कदा वावर. त्यांच्या सुखदु:खात सहभागी होणाºया नवनीत यांच्या राजकीय जडणघडणीची सुरूवात समाजजाणिवेतून झाली आहे.
आमदार रवि राणांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या प्रत्येक कार्यात हिरीरीने सहभागी होणाºया नवनीत यांनी सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून शिवसेनेचे चार टर्म खासदार राहिलेल्या आनंदराव अडसूळ यांना ‘मोदी लाट’ व प्रत्यक्ष नरेंद्र मोदी यांच्या अमरावती येथील प्रचार सभेनंतरही कडवी झुंज दिली. त्यांचा थोडक्या मतांनी पराभव झाला. मात्र, या निवडणुकीतून त्यांच्या राजकीय व्यक्तिमत्त्वाला विशिष्ट आकार आला. मोदी लाटेत दखलनीय मते त्यांनी खेचली. हरल्या; पण अपयशाने न डगमतता त्यांनी पाच वर्षे सातत्याने अमरावती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक लहान-मोठ्या गावाला भेटी दिल्यात. मेळघाटसारखा दुर्गम आदिवासी भाग त्यांनी पिंजून काढला. आदिवासींच्या समस्यांसाठी त्या लढल्या. कायम संपर्क ठेवला. स्वच्छ मनाच्या आदिवासींना नवनीत राणा आणि रवि राणा यांचे व्यक्तिमत्त्व भावले. आदिवासींनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केले. हे प्रेम भेटीपुरते नव्हते; ते मतदानात परिवर्तित झाले. दोन्ही निवडणुकांत नवनीत राणा यांना आदिवासींनी भरभरून मतदान केले. नवनीत यांच्यातील स्पार्क शरद पवार यांनी ओळखला होता. त्याचमुळे त्यांच्यावर पवारांनी विश्वास टाकला. देशभरात मोदी लाट असताना राज्यात केवळ अमरावतीत अपक्ष उमेदवार असलेल्या नवनीत राणा निवडून आल्या आहेत. ही केवळ पायरी होय, असे सांगणाºया नवनीत यांचा राजकीय आलेख सातत्याने वाढतच जाणार आहे, हे वेगळे सांगणे नको.
उभयता बाबा रामदेव यांचे अनुयायी
आमदार रवि राणा व नवनीत राणा हे दोघेही योगगुरू बाबा रामदेव यांचे अनुयायी आहेत. मुंबई येथील योग अध्यात्म शिबिरात त्यांची प्रथम भेट झाली. मैत्री होऊन कालांतराने त्यांनी विवाह केला. त्यानंतर नवनीत यांचा आमदार रवि राणा यांच्या आंदोलनात सक्रिय सहभाग सुरू झाला.
विश्वविक्रमी सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न
अमरावती शहरातील सायन्स कोअर मैदानावर योगगुरू बाबा रामदेव यांच्यासह देशातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत विश्वविक्रमी ३७२० जोडप्यांच्या सामूहिक विवाह सोहळ्यात बडनेरा मतदारसंघातील आमदार रवि राणा यांच्याशी लग्न ही त्यांची सामाजिक जाणिवेची सुरूवात ठरली. या सोहळ्यात २४४३ हिंदू, ७३९ बौद्ध, १५० मुस्लीम, १५ ख्रिस्ती, १३ अंध व ३६० पारधी जोडपी सहभागी होती. नापिकी व दुष्काळामुळे उपवर मुला-मुलींच्या लग्नासाठी शेतकरी कर्जबाजारी होऊ नये, ही त्यामागची संकल्पना. या सामूहिक विवाह सोहळ्याची नोंद गिनिज बूक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड व लिम्का बूक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात मोठा विवाह सोहळा अशी करण्यात आली. जनसामान्याच्या सुख-दु:खात सहभाग होण्यास सुरूवात झाली.