विधिमंडळात तारांकित; शिक्षकांना अशैक्षणिक कामे नकोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 10:52 AM2018-11-24T10:52:11+5:302018-11-24T10:52:33+5:30
राज्यातील शिक्षकांना अशैक्षणिक कामे सोपविली जात असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत बाधा पोहोचत असल्याप्रकरणी २० आमदारांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला आहे.
गणेश वासनिक।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्यातील शिक्षकांना अशैक्षणिक कामे सोपविली जात असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत बाधा पोहोचत असल्याप्रकरणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणसह २० आमदारांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला आहे. पुढील सोमवारी या विषयावर विरोधी पक्षाचे सदस्य सरकारला धारेवर धरणार असल्याची माहिती आहे.
‘राज्यातील शिक्षकांना अशैक्षणिक कामे न देण्याबाबत’ यावर तारांकित प्रश्न क्रमांक १२६७२३ विधिमंडळाने स्वीकारला आहे. त्याअनुषंगाने विधानमंडळ सचिवालय कक्ष अधिकारी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून माहिती गोळा करीत आहेत. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे हे या प्रश्नाच्या अनुषंगाने विधिमंडळात उत्तर देणार असल्याची बाब स्पष्ट केली आहे. येत्या काळात निवडणुकांच्या अनुषंगाने नवीन मतदार यादी करण्यासाठी बीएलओ म्हणून शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. जे शिक्षक हे काम स्वीकारणार नाही, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून दाखल केले जाणार आहेत. एकीकडे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र साकारण्याचे उद्दिष्ट असताना, प्रत्यक्षात अध्यापनापेक्षा अशैक्षणिक कामांमध्ये शिक्षकांना गुंतवून ठेवण्याचा डाव रचला जात आहे. त्यामुळे शाळा प्रशासन आणि विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याप्रकरणी शासनाने चौकशी केली असल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कोणती कार्यवाही करण्यात आली? कार्यवाही केली नसल्यास विलंबाची कारणे आदी विषयांवर आमदारांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे.
शिक्षणाचे तीनतेरा वाजत असताना राज्य सरकार मात्र त्याकडे लक्ष देत नाही. शिक्षकांवर अध्यापनाची प्रमुख जबाबदारी न सोपविता अशैक्षणिक कामे दिली जात आहे. हा विषय गंभीर असून, सरकारला तारांकित प्रश्नाच्या अनुषंगाने जाब विचारला जाईल.
- राधाकृष्ण विखे पाटील
विरोधी पक्ष नेता, विधानसभा.
राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा पाठपुरावा
शिक्षकांवर अशैक्षणिक कामे सोपविण्याचा सपाटा सुरू झाला आहे. त्यामुळे अध्यापनकार्य दुय्यम होत चालले आहे. ही बाब शाळा व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला बाधा पोहचविणारी आहे. शासनाने यासंदर्भात विशेष काळजी घेण्याबाबतचा पाठपुरावा राज्य प्राथमिक शिक्षक समितीने घेतल्याची माहिती प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.