१३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 01:12 AM2018-07-02T01:12:52+5:302018-07-02T01:13:20+5:30
राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्षलागवड मोहिमेचा जिल्ह्यात पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते वटवृक्षाच्या रोपणाने रविवारी महादेवखोरी वनक्षेत्रात शुभारंभ झाला. मोहिमेदरम्यान जिल्ह्यात महिनाभर २६ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट असून, शहरे, गावे, शाळा, कार्यालये, विविध संस्था यात सहभागी झाल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्षलागवड मोहिमेचा जिल्ह्यात पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते वटवृक्षाच्या रोपणाने रविवारी महादेवखोरी वनक्षेत्रात शुभारंभ झाला. मोहिमेदरम्यान जिल्ह्यात महिनाभर २६ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट असून, शहरे, गावे, शाळा, कार्यालये, विविध संस्था यात सहभागी झाल्या आहेत.
खासदार आनंदराव अडसूळ, विभागीय आयुक्त पीयुष सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, मुख्य उपवनसंरक्षक प्रवीण चव्हाण, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, उपवनसंरक्षक हेमंत मीना यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. महादेवखोरीतील टेकडीनजिक वनक्षेत्रात १ जुलै रोजी पहाटेपासूनच वृक्ष लागवडीसाठी विद्यार्थी, स्वयंसेवक, कार्यकर्ते, महिला संघटना, वनसंवर्धन संस्थांचे सदस्य आदी उत्साहाने दाखल झाले होते.
निसर्ग संरक्षण संस्था, वाईल्डलाईफ अँड एन्व्हार्यनमेंट कन्झर्वेशन सोसायटी यासारख्या अनेक संस्थांचा सहभाग होता. पालकमंत्र्यांनी वटवृक्ष लावून मोहिमेचा शुभारंभ केला. विद्यार्थी, स्वयंसेवकांनी मोठ्या प्रमाणात बांबूची रोपटी लावली. त्यामुळे अमरावती शहराला भूषणावह असलेल्या बांबू गार्डनच्या मालिकेत नवे बांबू उद्यान महादेवखोरी टेकडीपायथ्याशी आकारास येणार आहे. यावेळी सामाजिक वनीकरण उपसंचालक प्रदीप मसराम, रोहयो उपजिल्हाधिकारी आर. डी. काळे, जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी माया वानखडे, निशिकांत काळे, जयंत वडतकर, वडाळीचे नवे आरएफओ कैलास भुंबर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
वृक्ष लागवड मोहीम नियोजन
मोहिमेत विविध विभागांसह ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग मिळाला आहे. वन विभागाकडून ८ लाख ५० हजार, सामाजिक वनीकरणाकडून ५ लाख, ग्रामपंचायतींकडून ९ लाख ६हजार व विविध विभागांकडून ३ लाख ४४ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. ४५ लाखांहून अधिक रोपे तयार आहेत. शेतीबांधांवर शेवगा, कढीपत्ता, औषधी वनस्पती आदी वृक्ष लागवड होणार आहे. ‘नरेगा’अंतर्गत मनुष्यबळही उपलब्ध करुन घेण्यात येत आहे. ‘जिओ टॅगिंग’मुळे प्रत्येक खड्ड्याची, झाडाची नोंद व तपासणी ठेवता येणे शक्य आहे. नदीच्या दोन्ही काठांपासून एक किलोमीटर रूंदीत उपलब्ध क्षेत्रात वृक्षलागवड होणार आहे.
पर्यावरण संवर्धनाचे संस्कार
मोहिमेत वृक्षलागवडीसह पालक व विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणातील सहभागामुळे पर्यावरण संवर्धनाचा संस्कारही जोपासला जात आहे, असे पालकमंत्री पोटे यावेळी म्हणाले. निवृत्त वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी एस. झेड. काझी यांचा यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.