कुलगुरु निवड प्रक्रियेला आरंभ
By Admin | Published: December 29, 2015 02:25 AM2015-12-29T02:25:35+5:302015-12-29T02:25:35+5:30
हिवाळी अधिवेशनात प्रस्तावित नव्या लोकविद्यापीठ कायद्यावर चर्चा न झाल्याने अखेर अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरु निवड
प्रदीप भाकरे ल्ल अमरावती
हिवाळी अधिवेशनात प्रस्तावित नव्या लोकविद्यापीठ कायद्यावर चर्चा न झाल्याने अखेर अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरु निवड प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु मोहन खेडकर यांचा पंचवार्षिक कार्यकाळ २३ फेब्रुवारी २०१६ रोजी संपुष्टात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर कुलगुरु शोध समिती प्रक्रियेने वेग घेतला आहे. उल्लेखनीय म्हणजे, सप्टेंबर २०१५ मध्येच या निवड प्रक्रियेला सुरुवात अपेक्षित होती. मात्र, नवा विद्यापीठ कायदा विधीमंडळात पारित झाल्यानंतर नव्या नियमाप्रमाणेच कुलगुरुंची निवड होईल, अशी शक्यता उच्च व तंत्रशिक्षण विभागासह कुलपती कार्यालयाने व्यक्त केली होती. तथापि प्रस्तावित नवा लोकविद्यापीठ कायदा नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात सादर होवूनही त्यावर चर्चा होवू शकली नाही. त्यावर उपाय महणून राज्य सरकार जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्या अखेर अध्यादेश आणू इच्छित असली तरी विद्यमान महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याच्या तरतुदीप्रमाणे कुलगुरु निवड प्रक्रिया आरंभ करण्यात आली आहे.
शोध समितीवर विद्यापीठाचा सदस्य
४संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा एक सदस्य निवडण्यासाठी ८ जानेवारीला व्यवस्थापन परिषद आणि विव्दत परिषदेची संयुक्त बैठक कुलगुरु मोहन खेडकरांच्या उपस्थितीत होणार आहे. कुलगुरु शोध समितीत स्थानिक सदस्यांचा समावेश असतो.
इच्छुकांची मांदियाळीत भर
४संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरुपद भुषविण्यासाठी नागपूर व अमरावतीतील ज्येष्ठ प्राध्यापक इच्छुक असल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात आहे. कुलसचिवपद हुकलेल्या काही तज्ज्ञांनी कुलगुरुपदासाठी होणाऱ्या निवड प्रक्रियेला सामोरे जाण्यासाठी जोरदार पूर्वतयारी सुरू केली असल्याची विश्वसनिय माहिती आहे.
अशी आहे सदस्यांची पात्रता
४कुलगुरु शोध समितीवर विद्यापीठाकडून पाठविल्या जाणारा एक सदस्य हा आयआयटी, आयआयएमच्या संचालक दर्जाचा असणे अनिवार्य आहे.
समितीत कोण?
४कुलगुरु शोध समितीवर कुलपती तथा राज्यपालांद्वारे नामनिर्देशित एक प्रतिनिधी, उच्च शिक्षण विभागाने मुख्य सचिव किंवा समकक्ष अधिकारी आणि संबंधित विद्यापीठाच्या विव्दत आणि व्यवस्थापन परिषदेने संयुक्त बैठकीत निवड केलेला एक प्रतिनिधींचा समावेश असतो.
कुलगुरुपदासाठी पात्रता
४पीएचडीधारक, प्राध्यापक आणि प्रशासकीय पदाचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य दिल्या जाते. याशिवाय कुलगुरुपदासाठी इच्छुक उमेदवारांच्या नावावर एक शोधप्रबंध असने युजीसी नियमानुसार बंधनकारक आहे. प्रक्रियेच्या विविध टप्प्यात आपली पात्रता सिद्ध करणाऱ्या पात्र उमेदवारांच्या नावावर अंतिम टप्प्यात कुलपती तथा राज्यपालांकडून शिक्कामोर्तब केले जाते.