शहराचे गुगल मॅपिंग सुरु
By Admin | Published: January 14, 2016 12:08 AM2016-01-14T00:08:50+5:302016-01-14T00:08:50+5:30
शहराची ‘स्मार्ट सिटी’कडे वाटचाल सुरु झाली असली तरी सद्यस्थितीत महानगराच्या रचनेचे गुगल मॅपिंग केले जात आहे.
एजन्सी नेमली : रस्ते, घरे, खुले मैदान, वास्तूंचे आदींचे सर्वेक्षण
अमरावती : शहराची ‘स्मार्ट सिटी’कडे वाटचाल सुरु झाली असली तरी सद्यस्थितीत महानगराच्या रचनेचे गुगल मॅपिंग केले जात आहे. त्यानुसार डिजिटलाईज मॅपिंगला प्रारंभ करण्यात आला आहे. रस्ते, घरे, क्रीडांगणे, मैदाने, वास्तू आदींचे सर्वेक्षण करुन नकाशा तयार करण्यासाठी महापालिकेने एजन्सी देखील नेमली आहे.
नगरविकास विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार सन १९९२ नंतर आता सन २०१५ मध्ये अमरावती शहराचा विकास आराखडा तयार केला जात आहे. महापालिकेच्या हद्दीतील नागरी वस्त्यांचे सर्वेक्षण केले जात आहे. यात अमरावती, बडनेरा शहरासह १७ समाविष्ट खेड्यांचेही सर्वेक्षण केले जाणार असून मूलभूत सुविधांना प्राधान्य दिले जाणार आहे. शहर विकास आराखड्याचे सर्वेक्षण आणि डिजिटाईझ मॅपिंगची जबाबदारी पुणे येथील ‘मोनार्च सर्वेअर इंजिनियरींग प्रा.लि.’कडे सोपविण्यात आली आहे. या कंपनीने मौजे शेगाव भागातून सर्वेक्षणाचे काम देखील सुरु केले आहे. नवीन, जुन्या नागरी वस्त्यांची वस्तुस्थिती सर्वेक्षणात नमूद केली जाईल. सध्याची लोकसंख्या आणि २० वर्षानंतर शहराचे रुपडे कसे राहील, ही बाब गुगल मॅपिंगमध्ये समाविष्ट केली जात आहे. एमआरटीपी अॅक्टनुसार विद्यमान जमिनीचा गुगल नकाशा तयार करुन तो नगररचना विभागाच्या चमुकडून मंजूर करुन घेतला जाणार आहे. शहराचा डीपीआर तयार करण्यासाठी राज्य शासनाने नाशिक येथील नगररचना विभागाची विशेष चमू अमरावतीत पाठविली आहे. या चमुचे कामकाजही सुरु झाले आहे. मात्र, डीपीआरचे सर्वेक्षण आणि डिजिटाईझ मॅपिंगचा कालावधी प्रशासनाने मोनार्च कंपनीला १० महिने ठरवून दिला आहे. तब्बल २० वर्षानंतर होणाऱ्या विकास आराखड्यात कोणत्याही उणिवा राहू नये, यासाठी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार हे जातीने लक्ष घालून आहेत. पहिल्या टप्प्यात सर्वेक्षण आटोपले की विकास आराखड्याचे काम प्रारंभ होईल. (प्रतिनिधी)
मौजे प्रगणांनुसार सर्वेक्षण
अमरावती, बडनेरा शहरासह महापालिकेत समाविष्ट १७ खेड्यांचा विकास आराखडा तयार करताना २० मौजे प्रगणांचे सर्वेक्षण होणार आहे. यात पहिल्या टप्प्यात मौजे शेगाव येथून सर्वेक्षणाला प्रारंभ करण्यात आला आहे. घरांचे मोजमाप, ले-आऊट, जमिनीचा वापर, लोकसंख्येनुसार सर्वेक्षण केले जात आहे. डिजिटाईज मॅपिंग करुन तो डाटा जीआयएस प्रणालीशी लिंकद्वारे जोडला जाणार आहे.
विद्यमान जागा वापराचे गुगल मॅपिंग
शहराचे गुगल मॅपिंग करताना मूलभूत बाबींना प्राधान्य दिले जाणार आहे. यात शाळा, महाविद्यालये, रस्ते, उद्याने, हॉस्पिटल, रुग्णालये, संकूल, क्रीडांगणे, मॉल्स, समाजमंदिर, अंगणवाडी केंद्र, बसस्थानक, चौकांचे सौंदर्यीकरण, वाहतूक व्यवस्था, भाजीबाजार, हॉकर्स झोन, डीपी रस्ते, ले-आऊट, प्रकाश व्यवस्था, सार्वजनिक शौचालय, रस्ते फूटपाथ, वाहनतळ आदींचे सर्वेक्षण केले जात आहे.