शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करा, शेतकऱ्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2024 01:47 PM2024-02-09T13:47:35+5:302024-02-09T13:47:48+5:30
शासकीय खरेदी मध्ये सोयाबीनला 4 हजार 600 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत होता.
अमरावती जिल्ह्यात फेब्रुवारी महिना सुरू होताच, सोयाबीनच्या दारात प्रचंड घट झाली. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्येक क्विंटल 5 हजार रुपये दर अपेक्षित असताना सोयाबीनचे दर 4 हजार 300 रुपये प्रती क्विंटल वर येऊन पडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे साधारणपणे चार ते पाच लाख क्विंटल सोयाबीन विक्रीविनाच पडून असल्याने शासनाच्या हमी भावाप्रमाणे सोयाबीनची शासकीय खरेदी जिल्ह्यात सुरू झाली.
शासकीय खरेदी मध्ये सोयाबीनला 4 हजार 600 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत होता. मात्र, केवळ चार ते पाच दिवसांनी ही शासकीय खरेदी बंद पडली. या चार दिवसांत शासकीय खरेदी केंद्रावर 3 हजार 349 क्विंटल तर तिवसा शासकीय खरेदी केंद्रावर 1207 क्विंटल एवढ्या मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करण्यात आली. त्यामुळे आता हे शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र बंद झाल्याने याचा आर्थिक फटका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे शासनाने 10 ते 15 दिवस तरी शासकीय खरेदी केंद्र सुरू असायला पाहिजे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.