मानसिक छळ झालेल्या वयोवृद्धांच्या चौकशीस प्रारंभ
By admin | Published: June 14, 2016 12:07 AM2016-06-14T00:07:45+5:302016-06-14T00:07:45+5:30
ज्येष्ठ नागरिकांचा मानसिक छळ केल्याप्रकरणी येथून स्थानांतरित झालेले सहदुय्यम निबंधकांच्या व ...
दोघांचे जबाब मागविले : सहदुय्यम निबंधकांची तक्रार
अचलपूर : ज्येष्ठ नागरिकांचा मानसिक छळ केल्याप्रकरणी येथून स्थानांतरित झालेले सहदुय्यम निबंधकांच्या व एका मुद्रांक विके्रत्यांच्या चौकशीचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तहसीलदारांना दिले आहेत. त्यांनी सहदुय्यम निबंधकांना व ज्येष्ठ नागरिकांना नोटीस बजावून दोघांचे म्हणणे काय आहे, याचे स्पष्टीकरण मागितले आहे.
येथील वयोवृद्ध नागरिक काशिनाथ तिडके (८८) यांनी गेल्या चार महिन्यांपूर्वी दिलेल्या तक्रारीनुसार तहसीलदारांनी ७ डिसेंबर २०१५ रोजी सहनिबंधकांना पथ्रोट येथील गट नंबर १६१२ क्षेत्रफळ तिडके यांच्या नावाने करून देण्यास कळविले. त्यानुसार १५ डिसेंबर २०१५ रोजी सहदुय्यम निबंधकांच्या कार्यालयात गेलो असता त्यांनी जिरायती व तुकडा जमीन असल्यामुळे खरेदी होत नाही, असे सांगून तहसीलदारांना विचारून कळवितो, असे सांगितले. दुसऱ्या दिवशी ते तेथे गेले असता तेच उत्तर दिले. त्यामुळे तिडके या वयोवृध्दाने तहसीलदार मनोज लोणारकर यांची भेट घेतली. त्यांनी निबंधकांना खरेदी करून देण्यास सांगितले. मात्र सह दुय्यम निबंधक अर्जुन बडधे यांनी एजंट सदूमार्फत पैशाची मागणी केली. वृद्धाने पैसे देण्यास ठाम नकार दिला. नंतर बडधे यांनी १८ डिसेंबर रोजी सायंकाळी वृद्धाच्या भ्रमणध्वनीवर संपर्क करून धमकावले होते. याची तक्रार अचलपूर येथील पोलीस स्टेशनला तिडके यांनी देऊन बडधे यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली होती.
हा तक्रारीचा अर्ज ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांच्या निर्देशानुसार तपास अधिकारी मतीन शेख यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती यांच्याकडे वर्ग केला होता. त्यानुसार चौकशीला प्रारंभ झाला आहे. (शहर प्रतिनिधी)