शिक्षक मतदारसंघाच्या नामनिर्देशनाला प्रारंभ
By admin | Published: May 27, 2014 12:21 AM2014-05-27T00:21:45+5:302014-05-27T00:21:45+5:30
अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. या मतदारसंघासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवार २७ मे पासून सुरू होणार
पत्रपरिषद : विभागीय आयुक्तांची माहिती अमरावती : अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. या मतदारसंघासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवार २७ मे पासून सुरू होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डी. आर. बनसोड यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. पुढे बोलताना बनसोड म्हणाले की, शिक्षक मतदारसंघासाठी ३ जूनपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार आहे. ४ जून रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी होणार असून ६ जून रोजी नामनिर्देशनपत्र मागे घेता येणार आहे. २0 जून रोजी सकाळी ८ ते ४ या वेळेत मतदान होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीची मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन येथे २४ जून रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरु होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या निवडणुकीत अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम या पाच जिल्ह्यांतील ४४ हजार ७८८ एवढय़ा मतदारांची आतापर्यंत मतदार नोंदणी झाली आहे. मतदार नोंदणीची प्रक्रिया नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत सुरु राहणार असून ९ मतदारांनी आपली मतदार नोंदणी संबंधित तहसील कार्यालयात फॉर्म नं.१९ भरुन करावी, असे आवाहन बनसोड यांनी केले. शिक्षक मतदारसंघासाठी एकूण ७१ मतदान केंद्र कार्यान्वित केले असून प्रत्येक तालुक्यात एक मतदान केंद्र देण्यात येणार आहे. अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक मतदार व मुख्यालय असल्यामुळे येथे मतदान केंद्राची संख्या अधिक असल्याचेही त्यांनी सांगितले. १ नोव्हेंबर २0१३ रोजी शिक्षक मतदारसंघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये मय्यत व सेवानवृत्तांची नावे विशेष मोहिमेंतर्गत वगळण्यात आली आहेत. शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी बॅलेट पेपरचा वापर केला जाणार असल्याचेही ते म्हणाले. पसंती क्रमानुसार मतदारांना मतदान करावे लागणार आहे. निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृह क्रमांक २ येथे व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाईल. या पत्रासोबत सामान्य प्रवर्गासाठी १0 हजार रुपये तर अनुसूचित जाती-जमातीसाठी पाच हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागेल. यात सात निवडणूक निर्णय अधिकार्यांची नियुक्ती करण्यात असल्याचेही विभागीय आयुक्तांनी यावेळी सांगितले. पत्रपरिषदेला सहायक निवडणूक अधिकारी माधव चिमाजी, तहसीलदार वैशाली पाथरे यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)