संत गाडगेबाबा सूतगिरणी तीन महिन्यांत सुरू करा
By admin | Published: March 18, 2017 12:03 AM2017-03-18T00:03:27+5:302017-03-18T00:03:27+5:30
येथील संत गाडगेबाबा सहकारी सूतगिरणीची विक्री थांबवून या गिरणीचे उत्पादनकार्य तीन महिन्यांच्या कालावधीत सुरू करावी, ...
उच्च न्यायालयाचे आदेश : कामगारांना मिळणार न्याय
दर्यापूर : येथील संत गाडगेबाबा सहकारी सूतगिरणीची विक्री थांबवून या गिरणीचे उत्पादनकार्य तीन महिन्यांच्या कालावधीत सुरू करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. रवि कोरडे यांनी गिरणीच्या पुनरूज्जीवनाबाबत दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने हे आदेश दिलेत. ही गिरणी पुन्हा सुरू झाल्यास विजनवासात गेलेले दर्यापूरचे औद्योेगिक वैभव पुन्हा प्राप्त होणार आहे.
सहकार न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र सहकारी बँक, मुंबई यांनी सूतगिरणी ताब्यात घेऊन ती बंद केली. त्यावेळी गिरणीवर लोकनियुक्त संचालक मंडळ अस्तित्वात होते. कामगारांना नोटीस न देता त्यावेळी ही गिरणी बंद पाडण्यात आली. परंतु सदर गिरणी राज्य सहकारी बँकेकडून घेतलेल्या कर्जापोेटी गहाण नसल्याचे बँकेकडून पत्राद्वारे कळविण्यात आले असतानासुद्धा ही गिरणी बंद केल्याने बँकेने शासनाची फसवणूक केल्याचे दिसून आले. त्यानंतर शासनामार्फत अवसायकांविरूद्ध उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाने सूतगिरणीच्या संपूर्ण मालमत्तेच्या विक्रीची कारवाई तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.(प्रतिनिधी)