श्री शिवशाही महोत्सवाला थाटात प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:58 AM2017-12-29T00:58:26+5:302017-12-29T00:58:43+5:30
स्थानिक रूख्मिणी सामाजिक विकास बहुउद्देशीय मंडळ आणि शिव सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गतवर्षीपासून आरंभलेल्या श्री शिवशाही महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रमाता जिजाऊ यांचे १३ वे वंशज सिंदखेड राजा येथील शिवाजी राजे जाधव यांच्या हस्ते गुरूवारी थाटात झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्थानिक रूख्मिणी सामाजिक विकास बहुउद्देशीय मंडळ आणि शिव सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गतवर्षीपासून आरंभलेल्या श्री शिवशाही महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रमाता जिजाऊ यांचे १३ वे वंशज सिंदखेड राजा येथील शिवाजी राजे जाधव यांच्या हस्ते गुरूवारी थाटात झाले. मराठमोळ्या संस्कृतीसह शिवकालीन शस्त्रप्रदर्शन आणि रायगड किल्ल्याचे शिवकालीन छायाचित्र प्रदर्शनी हे महोत्सवाचे खास आकर्षण आहे.
येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात दोन दिवसीय श्री शिवशाही महोत्सवाच्या उद्घाटनीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी राजे भोसले होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, माजी महापौर विलास इंगोले, महापालिका काँग्रेसचे विरोधीपक्ष नेता बबलू शेखावत, डॉ. पंजाबराव देशमुख को-आॅपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष राजेंद्र महल्ले, जिजाऊ कर्मशियल बँकचे अध्यक्ष अविनाश कोठाळे, पुणे येथील अविनाश धर्माधिकारी, अमोल पाटील, महोत्सवाचे आयोजक भूषण फरतोडे, संपतराव देशमुख, नगरसेविका नूतन भुजाडे, जयश्री डहाके, सुचिता बिरे, महेश पवार, ठाणेदार मनीष ठाकरे आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनस्थ पुतळ्याचे पूजन व दीपप्रज्वलनाने महोत्सवाला सुरूवात झाली. अकोला येथील शिवाजी कला महाविद्यालयाचे शिरिष कडू व त्यांच्या चमुने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित पोवाडा सादर केला. प्रास्ताविक भूषण फरताडे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रमाता जिजाऊ यांचे १३ वे वंशज सिंदखेडराजा येथील शिवाजीराजे जाधव यांचा परिचय गजानन देशमुख यांनी करून दिला. दोन दिवसीय श्री शिवशाही महोत्सवातून राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन कार्य तरूण पिढीला चिरकाल स्मरणात राहील, असे मान्यवरांचे विचार मोलाचे ठरले. ‘यशाची पाऊलवाट’ या दमदार मार्गदर्शनातून आयएएस अविनाश धर्माधिकारी यांनी तरूणाईला रोजगाराचा वाटा शोधण्यासाठी दिलेल्या टीप्स त्यांच्यासाठी जणू शिदोरी ठरल्यात, हे विशेष.