कल्याणनगर रस्त्याचे काम सुरू करा अन्यथा विभागाला ठोकणार कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 09:40 PM2018-12-07T21:40:06+5:302018-12-07T21:40:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : कल्याणनगर चौक ते यशोदानगर चौकापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. याकरीता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कल्याणनगर चौक ते यशोदानगर चौकापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. याकरीता कंत्राटदाराने रस्ता खोदला. पण, गेल्या काही आठवड्यापासून सदर कामे बंद असल्याने येथील व्यापाऱ्यांनी आ. रवि राणा यांच्याकडे तक्रार नेल्यानंतर त्यांनी शुक्रवारी व्यापाऱ्यांसमवेत सार्वजनिक बांधकाम विभागात बैठक घेतली. शनिवारपर्यंत रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही, तर सार्वजनिक बांधकाम विभागाला आपण कुलूप ठोकू, असा इशारा आ. राणा यांनी उपस्थित अभियंत्यांना दिला.
आ. रवि राणा यांनी अधीक्षक अभियंता विवेक साळवे, कार्यकारी अभियंता सदानंद शेंडगे, दर्यापूरचे कार्यकारी अभियंता अनिल जवंजाळ व संबंधित विभागाचे उपअभियंता यांच्याकडून मतदारसंघातील विकासकामांचा आढावा घेतला. कल्याणनगर ते यशोदानगर हा रस्ता महत्त्वाचा असूनही गेल्या काही आठवड्यांपासून मशीन नादुरूस्त असल्याने बंद असल्याचे कारण देत कंत्राटदाराने हे काम बंद केले. या मार्गावर अनेक व्यापाऱ्यांची प्रतिष्ठाणे आहेत. रस्त्याचे खोदकाम केल्याने या ठिकाणी ग्राहक येत नाहीत. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. याबाबत व्यापाऱ्यांनी यावेळी संताप व्यक्त केला.
कुठल्याही अधिकाऱ्याने लोकप्रतिनिधींच्या राजकारणात न पडता, आपले जे कर्तव्य आहे, ते चोख बजावावे. कुठल्याही वृत्तपत्राला राजकीय स्टेटमेंट देऊ नये, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा दमही आ. राणा यांनी भरला.
कल्याणनगर परिसरातील व्यापारी बाबासाहेब शिरभाते, वसंतराव कडू, राजू मालवीय, अरुण बोबडे, संजय काळे, कैलास पवार, किशोर घोडेस्वार, नंदकिशोर बारबुद्धे, किशोर शिरभाते, देविदास गृप्ता, बबलू अग्रवाल, संजय मतानी, विजय जयस्वाल, सुनील चव्हाण, महेश खासबागे यांच्यासह युवा स्वाभिमानी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.