चिखलदरा येथील स्कॉयवॉकचे कामे सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:18 AM2021-08-18T04:18:54+5:302021-08-18T04:18:54+5:30
अमरावती : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा येथे निर्माण होणारा स्कायवॉक हा देशाचे भूषण आहे. स्कायवॉक झाल्याने जिल्ह्याला ऐतिहासिक महत्त्व ...
अमरावती : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा येथे निर्माण होणारा स्कायवॉक हा देशाचे भूषण आहे. स्कायवॉक झाल्याने जिल्ह्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त होईल. मात्र, केंद्र आणि राज्य शासनाच्या मतभेदात स्कायवॉक निर्मितीचे काम बंद पडले आहे. त्यामुळे स्कायवॉकचे काम त्वरित सुरू करावे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने शासनाला करण्यात आला. शहराध्यक्ष बंटी रामटेके यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्यदिनी स्कायवॉकच्या पायथ्याशी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
चिखलदऱ्यातील गोराघाट पॉईंटपासून ते हरिकेन पॉइंटपर्यंत स्कायवॉक ४०७ मीटरचा हा प्रकल्प २०१८ मध्ये प्रस्तावित करण्यात आला आहे. यासाठी ३५ कोटी रुपये खर्च होणार आहे. याचे जलद गतीने काम देखील सुरू झाले होते. मात्र, राज्य आणि केंद्र सरकारच्या उदासीन धोरणामुळे स्कायवॉकचे काम बंद पडले आहे. मोदी विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष असल्यामुळे विशेषतः जिल्ह्याचे काही लोकप्रतिनिधी हे स्कायवॉकवर राजकारण करीत असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने करण्यात आला आहे. दरम्यान स्कायवॉक निर्मितीचे काम बंद पडले असून ते तत्काळ सुरू करावे, यासाठी चिखलदरा येथे जाऊन स्कायवॉकच्या पायथ्याशी प्रहारच्यावतीने मोदी सरकार विरोधात निदर्शने केलीत. यावेळी शहराध्यक्ष बंटी रामटेके, उपशहर प्रमुख श्याम इंगळे, अभिजित गोंडाणे, कमलेश दंडाळे, निखिल सावध, रॉयल गोंडाणे, गोलू पाटील आदी उपस्थित होते.