झेडपीची रखडलेली पदभरती त्वरित सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:14 AM2021-03-26T04:14:40+5:302021-03-26T04:14:40+5:30
अमरावती : जिल्हा परिषद अंतर्गत घेण्यात येणाऱ्या ग्रामसेवक, आरोग्य सेवक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, अशा विविध पदांची भरती प्रक्रिया ...
अमरावती : जिल्हा परिषद अंतर्गत घेण्यात येणाऱ्या ग्रामसेवक, आरोग्य सेवक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, अशा विविध पदांची भरती प्रक्रिया दोन वर्षांपासून रखडली आहे. सदर विविध पदांची भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, अशी मागणी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी जिल्ह्याधिकाऱ्यांना निवेदनाव्दारे केली आहे.
जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत गट ‘क‘ मधील सरळसेवेची रिक्त पदाची जाहिरात, १ मार्च २०१९ ला प्रसिद्ध करण्यात आली होती. अनुसूचित क्षेत्राबाहेरील आणि क्षेत्रातील रिक्त पदाकरिता सदर जाहिरात प्रकाशित झाली होती. यासाठी अनेक उमेदवारांनी रीतसर अर्जही केलेत. मात्र, दोन वर्षे पूर्ण होऊनसुद्धा अद्याप या पदासाठीची परीक्षा झालेली नाही. त्यामुळे जिल्हा परिषद सरळसेवा भरती प्रक्रियेची तारीख निश्चित करून वेळापत्रक प्रसिद्ध करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
बॉक्स
कालबद्ध कार्यक्रमानंतर पदभरती नाही
२१ डिसेंबर २०१९ निर्गमित करुन बिगर आदिवासींनी, पात्र आदिवासींच्या बळकावलेल्या राखीव जागा रिक्त करण्याची मुदत ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत दिलेली होती. रिक्त होणारी अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाची विशेष पदभरतीचा कालबद्ध कार्यक्रमाची मुदत संपून गेली आहे. तरी १२,५०० रिक्त पदांपैकी फक्त काहीच पदे भरण्यात आली. उर्वरित पदांविषयी जाहिरातीही काढण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे रिक्त झालेल्या आदिवासी समाजाच्या घटनात्मक हक्काच्या राखीव जागा कालबद्ध कार्यक्रम आखून दिल्यावरही भरलेल्या नाहीत. ही पदे भरण्याची मागणी आदिवासी विद्यार्थ्यांनी केली आहे.