आजपासून रोहिणी नक्षत्रास प्रारंभ
By admin | Published: May 25, 2017 12:11 AM2017-05-25T00:11:47+5:302017-05-25T00:11:47+5:30
भारतीय पंचांगशास्त्राच्या कालगणनेनुसार भारतीय उपखंडातील पावसाळ्याच्या चार महिन्यांना एकूण बारा नक्षत्रांमध्ये विभागण्यात आले आहे.
एकूण १२ नक्षत्रे : प्रत्येक चार चरणांनंतर हवामानात बदल
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूरबाजार : भारतीय पंचांगशास्त्राच्या कालगणनेनुसार भारतीय उपखंडातील पावसाळ्याच्या चार महिन्यांना एकूण बारा नक्षत्रांमध्ये विभागण्यात आले आहे. ती बारा नक्षत्रे, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसु, पुण्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती याप्रमाणे आहेत. यापैकी रोहिणी हे पहिले नक्षत्र असून याच नक्षत्रापासून देशांत सागरी किनारी पावसाळ्याला सुरूवात होते. या पहिल्या ‘रोहिणी’ नक्षत्राचा प्रारंभ गुरूवार २५ मे रोजी सकाळी ८ वाजून १३ मिनिटांनी होत आहे.
सूर्याच्या नक्षत्रप्रवेशावेळी असलेल्या ग्रहस्थितीवरून नक्षत्रनिहाय पावसाचा अंदाज वर्तविण्यात येतो. प्रत्येक नक्षत्र हे चार चरणात विभागण्यात आलेले असून, प्रत्येक चरण हे ३ ते चार दिवसांचे असते. पंचांग शास्त्रानुसार वर्तविण्यात आलेल्या पावसाच्या अंदाजानुसार सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो.
त्यावेळेनुसार नक्षत्र प्रवेशकुंडलीत मिथून लग्नकुंभ दर्शविले आहे. उपरोक्त दोन्ही वायुतत्त्वाच्या राशी असल्याने, या नक्षत्रात वारावादळाचे प्रमाण जास्त राहणार आहे.
नक्षत्राच्या पहिल्या चरणानंतर हवामानात बदल होऊन, सायंकाळच्या सुमारास अनेक भागात वादळासह पावसाचे संकेत देण्यात आले आहेत. परंतु, हे पावसाळी वातावरण फार काळ टिकून राहणार नाही. ३ जुनचे सुमारास बुध वृषभ राशीत रवीच्या सानिध्यात येतो. त्यावेळी देशाच्या सागरी किनाऱ्यावर कोकणी भागात मान्सूनपूर्व सरी येतील.
इतरत्र हवामानात बदल होऊन उष्णतामान थोडे कमी होईल. नाडीचक्रानुसारही यानक्षत्रात पर्जन्ययोग दिसून येत नाहीत.
यंदा पावसाळा उशिराच
यावर्षी शके १९३९ अर्थात सन २०१७-१८ चा पावसाळा थोडा उशिरा सुरू होऊन नंतरही बेताचा दिसून येतो. मृगाच्या शेवटी आणि आर्द्रामध्ये पावसाळ्याला सुरूवात होऊन नियमित पावसाळा जुलैमध्येच सुरू होईल. मधली नक्षत्रे पुनर्वसू, पुण्य, अश्लेषा यामध्ये पुरेसा पाऊस होईल. पुढची मघा, पूर्वा, उत्तरा ही नक्षत्रे थोडी आखडती असून शेवटचे हस्त व स्वाती नक्षत्रे भरपूर वृष्टीची आहेत. हा अंदाज पंचांगशास्त्राने ग्रहस्थितीनुसार वर्तविला आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज, प्रत्यक्ष परिस्थिती व अनुभवातूनच योग्य ते निर्णय घ्यावेत.