राज्य सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या ३० जुलैपर्यंत होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:10 AM2021-07-11T04:10:45+5:302021-07-11T04:10:45+5:30
सर्वसाधारण बदल्यांच्या निघाला मुहूर्त, सामान्य प्रशासन विभागाचे निर्देश अमरावती : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सन २०२१-२२ या चालू आर्थिक वर्षात ...
सर्वसाधारण बदल्यांच्या निघाला मुहूर्त, सामान्य प्रशासन विभागाचे निर्देश
अमरावती : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सन २०२१-२२ या चालू आर्थिक वर्षात राज्य सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या ३० जुलैपर्यंत कराव्या लागणार आहेत. त्याअनुषंगाने राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ९ जुलै रोजी निर्देश जारी केले.
कोरोना नियमांचे पालन करूनच अधिकारी, कर्मचारी यांच्या सर्वसाधारण बदल्या कराव्या लागणार आहेत. दरवर्षी एप्रिल, मे महिन्यात कर्मचाऱ्याच्या बदल्या करण्यात येतात. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे अधिकारी, कर्मचाऱ्याच्या बदल्यांवरही विरजण आले आहे. आता सर्वसाधारण बदल्यांचा मार्ग सुकर झाल्याने बदलीपात्र कर्मचाऱ्यांना उशिरा का होईना, न्याय मिळण्याची चिन्हे आहेत. सर्वसाधारण वगळता अन्य बदल्या १४ ऑगस्ट २०२१ पर्यंत करण्यास शासनाने आदेश जारी केले आहे.
-----------------
बदलीसाठी या अटी-शर्ती
- राज्याच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाल्यामुळे बदली भत्त्यावरील खर्च मर्यादित स्वरूपात करण्याच्या दृष्टीने सर्वसाधारण बदल्या या एकूण कार्यरत पदांच्या १५ टक्के एवढ्या मर्यादेत सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने करण्यात येतील.
- १५ टक्के मर्यादेत सर्वसाधारण बदल्या करताना संबंधित पदावर विहित कालावधी पूर्ण झालेल्या सर्व पात्र अधिकारी, कर्मचारी यांच्यापैकी जास्त कालावधी पूर्ण झाला आहे, अशांची प्राधान्याने बदली करावी लागेल. सर्वप्रथम सर्वसाधारण बदल्यांची कार्यवाही ३१ जुलै २०२१ पर्यंत पूर्ण करावी लागेल.
- सर्वसाधारण बदल्यांची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतरच जी पदे रिक्त राहतील केवळ अशा रिक्त पदांवरच विशेष कारणास्तव बदल्या १ ते १४ ऑगस्ट २०२१ या कालावधीपर्यंत अनुज्ञेय राहतील. सबब, जे पद रिक्त नाही अशा पदावरील कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांची अन्यत्र बदली करून अशा पदावर विशेष कारणास्तव बदली करता येणार नाही.
- विशेष कारणास्तव करावयाच्या बदल्या या एकूण कार्यरत पदांच्या १० टक्के एवढ्या मर्यादेत करण्यात येणार आहे.
- ज्या विभागांमध्ये बदलींच्या कार्यवाहीसाठी संगणकीय प्रणाली (ऑनलाईन) पूर्णत: किंवा अंशत: विकसित केली, अशा विभागांनी या प्रणालीचा वापर करावा.