राज्यात वाघांचे लोकेशन मोबाईलवर, जंगलात अत्याधुनिक कॅमेरे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 05:29 PM2018-09-05T17:29:48+5:302018-09-05T17:30:17+5:30
व्याघ्र प्रकल्प आणि जंगलात वाघांच्या हालचाली, संरक्षणासाठी ट्रॅपिंग कॅमे-याने मॉनेटरिंग केले जात होते.
- गणेश वासनिक
अमरावती : व्याघ्र प्रकल्प आणि जंगलात वाघांच्या हालचाली, संरक्षणासाठी ट्रॅपिंग कॅमे-याने मॉनेटरिंग केले जात होते. मात्र, आता विदेशी बनावटीचे अत्याधुनिक कॅमेरे जंगलात बसवून वाघांचे लोकेशन थेट वनरक्षकांना स्वत:च्या मोबाईलवर बघता येणार आहे. राज्याच्या वनविभागात प्रायोगिक तत्त्वावर ४० अत्याधुनिक कॅमेरे खरेदी करण्यात आले आहे.
चार वर्षांपासून राज्यात वाघांची शिकार आणि नैसर्गिक मृत्यूमुळे वनविभाग हतबल झाला आहे. व्याघ्र प्रकल्प आणि प्रादेशिक वनविभागाच्या जंगलांमध्ये वाघांची संख्या वाढीस लागल्याने वाघांचे ‘डे टू डे मॉनेटरिंग’ करण्यासाठी वनविभागाने आधुनिक उपकरणांचा संरक्षणासाठी उपयोग करणे सुरू केले आहे. इम्प्रेशन पॅड, ट्रान्झॅक्ट लाईन या पारंपरिक वाघ संरक्षणाच्या पद्धतीमागे सोडून वनविभागाने जीपीएस ट्रॅकिंग, कॅमेरा ट्रॅपिंग, कॉलर आयडी आणि स्थानिक पातळीवर नवनवीन सॉफ्टवेअर विकसित केले आहे.
मध्यंतरी वाघांचे मॉनेटरिंग सेन्सर कॅमेराद्वारे जात असतानाच आता अमेरिकन बनावटीचे महागडे अत्याधुनिक कॅमेरे वनविभागाने काही प्रमाणात खरेदी केले आहे. जवळपास हे ४० कॅमेरे आहेत. वनकर्मचा-यांना थेट वाघांची जंगलातील भ्रमंती त्यांच्याजवळ असलेल्या मोबाईलवर क्षणोक्षणी घेता येणार आहे. जंगलात लावण्यात येणा-या अशा कॅमे-यात जीपीएस प्रणालीशी संलग्न करण्यात आले असून, त्याकरिता नवीन सॉफ्टवेअर विकसित केले जाणार आहे. हे सॉफ्टवेअर ठराविक वनाधिकाºयांच्या मोबाईलशी जोडलेले जाईल. जेणेकरून त्या अधिका-यास त्यांच्या वनक्षेत्रात असलेल्या वाघांचे दैनंदिन लोकेशन मोबाईलच्या माध्यमातून घेता येणार आहे.
कनेक्टिव्हिटीमुळे फेल ठरण्याची भीती
वाघांचे लोकेशन आतापर्यंत जीपीएस व कॉलर आयडीमुळे घेण्यासाठी कार्यालयीन संगणकांचा वापर केला जायचा. मात्र, विदेशी बनावटीच्या या कॅमे-यामुळे विकसित सॉफ्टवेअर ०१ च्या माध्यमातून पठाराच्या किंवा टेकडी नसलेल्या जंगलातील वाघांचे लोकेशन मोबाईलमध्ये सहज घेता येणार आहे. हा प्रयोग यवतमाळ, चंद्रपूर, उमरेड, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात केला जात आहे. मात्र, मोबाईल नेट कनेक्टिव्हिटी असल्यास वाघांचे दैनंदिन लोकेशन कर्मचाºयांना मोबाईलमध्ये पाहता येईल. कनेक्टिव्हिटी नसल्यास हे महागडे कॅमेरे फेल ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.
इतर राज्यांनी केले अनुकरण
महाराष्ट्र वनविभाग वाघांच्या संरक्षण व संवर्धनासाठी नवनवीन तंत्रज्ञान उपाययोजना आखत असल्याने गुजरात, मध्यप्रदेश, तेलंगना, राजस्थान, उत्तरप्रदेश, उत्तराखंडसारखे राज्य वाघांच्या संरक्षण व संवर्धनासाठी महाराष्ट्राकडून घेत असलेल्या उपाययोजनेचे धडे घेत आहे. व्याघ्र संवर्धनात सध्यातरी मध्यप्रदेश अव्वलस्थानी आहे. अत्याधुनिक कॅमे-यांमुळे वाघांच्या संरक्षणासाठी बळकटी मिळणार आहे.
राळेगाव तालुक्यात चार कॅमेरे
वनविकास महामंडळाच्या अखत्यारित येणा-या राळेगाव तालुक्यात एका नरभक्षक वाघिनीने आतापर्यंत १४ लोकांचे बळी घेतले आहे. मात्र, अद्यापसुद्धा या वाघिनीचा शोध वनविकास महामंडळाच्या अधिका-यांना लागलेला नाही. या वाघिनीला जेरबंद करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात असताना मोबाईलवर वाघांचे लोकेशन देणारे कॅमेरे राळेगाव तालुक्यातील संवेदनशील जंगलात बसविले असून, सॉफ्टवेअर विकसित करण्याचे काम प्रगतिपथावर आहे.
जंगलात वाघांचे संरक्षण व सुरक्षिततेचा मोठा प्रश्न आहे. प्रायोगिक तत्त्वावर अत्याधुनिक ४० कॅमेरे खरेदी केले असून, ते संवेदनशील भागात बसविले आहेत. नवीन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हे कॅमेरे वनकर्मचा-यांच्या मोबाईलशी जोडले जातील. त्यामुळे वाघांचे लोकेशन वनकर्मचा-यांना सहजतेने मिळण्यास मदत होईल.
- सुनील लिमये,
अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वन्यजीव) महाराष्ट्र