ईव्हीएम विरोधात राज्यभरात लढा उभा करणार : आनंदराज आंबेडकर

By उज्वल भालेकर | Published: January 3, 2024 07:09 PM2024-01-03T19:09:52+5:302024-01-03T19:11:37+5:30

अमरावती लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक, इंडिया आघाडीशी चर्चा सुरु

State-wide fight given against EVM says Anandraj Ambedkar | ईव्हीएम विरोधात राज्यभरात लढा उभा करणार : आनंदराज आंबेडकर

ईव्हीएम विरोधात राज्यभरात लढा उभा करणार : आनंदराज आंबेडकर

उज्वल भालेकर / अमरावती: सध्या देशभरात नागरिकांमध्ये ईव्हीएमविरोधात संभ्रम आहे. त्यामुळे आगामी निवडणुका या सर्व बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी जोर धरत आहे; परंतु सत्तेत असलेले भाजपचे सरकार हे बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यास घाबरत आहे. त्यामुळे सध्या भाजपला मिळणारा विजय हा त्यांचा विजय नसून ईव्हीएमचा विजय आहे. त्यामुळे ५ जानेवारी रोजी रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन राज्यभरात ईव्हीएमविरोधात लढा पुकारणार असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी बुधवारी पत्र परिषदेतून दिली.

आनंदराज आंबेडकरांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी रिपब्लिकन सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. त्याअनुषंगाने आनंदराज आंबेडकर हे मागील दोन वर्षांपासून ते सातत्याने अमरावतीचा दौरा करत आहेत. भीमा कोरेगाव शौर्यदिनिमित्त आयोजित कार्यक्रमानिमित्त आनंदराज आंबेडकर हे दोन दिवसांपासून अमरावतीमध्ये आहेत. त्यामुळे त्यांनी पत्रकार परिषदेतून माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली.

ते म्हणाले, सध्या देशाची वाटचाल ही हुकूमशाहीकडे होताना दिसून येत असून, सर्व सामान्य नागरिकांच्या विरोधातील कायदे संसदेत पारित करण्यात येत आहेेत. त्यामुळे देशातील लोकशाही वाचवायची असेल तर सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. आम्ही इंडिया आघाडीसोबत जाण्यास तयार आहोत. यासाठी आम्ही त्यांना लोकसभेसाठी अमरावतीच्या एकाच जागेची मागणी करत आहोत आणि त्याअनुषंगाने इंडिया आघाडीतील काही वरिष्ठ नेत्यांशी चर्चादेखील सुरू आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात शरद पवार यांचीदेखील भेट घेतली आहे. त्यामुळे वेळेवर सर्व चित्र स्पष्ट होईलच; परंतु या बरोबर देशात भाजपला सत्तेबाहेर आणण्यासाठी ईव्हीएमविरोधात लढा उभारणे तितकेच महत्त्वाचे असून, लवकरच राज्यभरात हा लढा उभा करणार असल्याचेही आनंदराज आंबेडकर म्हणाले. यावेळी रिपब्लिकन सेनेचे विनायक दुधे, सतीश सियाले, ॲड. पी.एस. खडसे, बाळासाहेब वाकोडे उपस्थित होते.

Web Title: State-wide fight given against EVM says Anandraj Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.