काेरोना उपाययोजनांसाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनाला चिकटवले निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:11 AM2021-05-29T04:11:25+5:302021-05-29T04:11:25+5:30
कॅप्शन - मुख्यमंत्र्यांच्या दालनाला निवेदन चिकटवताना आ. रवि राणा ----------------------------------------------------------------------------------------------- रवि राणांची संकल्पना, मुख्यमंत्र्यांनी दालनाचा चेहरा पाहिला नसल्याचा आक्षेप ...
कॅप्शन - मुख्यमंत्र्यांच्या दालनाला निवेदन चिकटवताना आ. रवि राणा
-----------------------------------------------------------------------------------------------
रवि राणांची संकल्पना, मुख्यमंत्र्यांनी दालनाचा चेहरा पाहिला नसल्याचा आक्षेप
अमरावती : राज्यात कोरोना संक्रमणाने जनता त्रस्त झाली आहे. काेरोना नियंत्रणासाठी उपाययाेजनांचा अभाव आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दालनात येत नाही, नागरिकांना भेटत नाहीत, या मुद्द्यांवर आमदार रवि राणा यांनी शुक्रवारी मुंबई येथे चक्क मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या दालनाला निवेदन चिकटवले. कोरोना संक्रमणाचा सामना करण्यासाठी संबंधित यंत्रणेला आदेशित करावे, अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली.
आमदार राणा यांनी निवेदनात मागण्या नोंदविल्या आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांनी शासकीय व खासगी रुग्णालये, जे शासनाच्या पॅनेलवर आहेत, अशा रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर मोफत उपचार दिले आहेत. त्याच धर्तीवर उपाययोजना कराव्या. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत आरोग्य यंत्रणा सक्षम करावी. नागरिकांना लस उपलब्ध करून द्यावी. अमरावती येथील रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणात दोषींवर कठोर शासन करून उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. कोरोनाकाळात कामगार, कष्टकऱ्यांना दरमहा १५०० रुपये मानधन देण्यात यावे. लॉकडाऊनच्या काळातील कृषी व घरगुती वीज बिल माफ करावे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बी-बियाणे उपलब्ध करावे. काळाबाजार होणार नाही, याची दक्षता घ्यावी. यंदा अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी. कृषिकर्ज सुलभपणे मिळण्यासाठी व्यवस्था करावी. लॉकडाऊनमध्ये रोजगार उपलब्ध करावे आदी मागण्या आमदार रवि राणा यांनी निवेदनातून केल्या आहेत.