स्टेशन मास्टरचा फ्लॅट फोडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 10:36 PM2018-12-29T22:36:14+5:302018-12-29T22:36:36+5:30
बडनेरा हद्दीतील निंभोरा स्थित मीनाक्षी अपार्टमेंटला चोरट्यांनी लक्ष्य केले. स्टेशन मास्टरचा फ्लॅट फोडून मुद्देमाल लंपास केला. विशेष म्हणजे, चोरांनी अन्य फ्लॅटचे बाहेरून दार लावल्याने नागरिकांची चांगलीच पंचाईत झाली होती. सदर कुटुंब बाहेरगावी असल्याने किती मुद्देमाल लंपास केला, ही बाब स्पष्ट झाली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बडनेरा हद्दीतील निंभोरा स्थित मीनाक्षी अपार्टमेंटला चोरट्यांनी लक्ष्य केले. स्टेशन मास्टरचा फ्लॅट फोडून मुद्देमाल लंपास केला. विशेष म्हणजे, चोरांनी अन्य फ्लॅटचे बाहेरून दार लावल्याने नागरिकांची चांगलीच पंचाईत झाली होती. सदर कुटुंब बाहेरगावी असल्याने किती मुद्देमाल लंपास केला, ही बाब स्पष्ट झाली नाही.
निंभोरा खुर्द स्थित विजयपथनगर येथील मीनाक्षी अपार्टमेंटला चोरांनी शनिवारी लक्ष्य केले. सकाळी तेथील रहिवासी राहुल ढोक यांना फ्लॅटचे दार बाहेरून बंद असल्याचे आढळून आले. त्यांनी शेजाऱ्यांना फोन करून दार उघडण्यास सांगितले. यानंतर पाहणी केली असता, त्यांना स्टेशन मास्टर प्रदीप तामगाडगे यांच्या फ्लॅटचा कडीकोंडा तुटलेला दिसला. त्यांनी अन्य फ्लॅटची पाहणी केली असता, अजय तितरे यांच्याही फ्लॅटचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी प्रदीप तामगाडगे यांच्या फ्लॅटमध्ये शिरून पाहणी केली असता, घरातील साहित्य अस्ताव्यस्त केले होते. त्यामुळे चोरी झाल्याचे लक्षात आले. ढोक यांनी या घटनेची माहिती तळमजल्यावर राहणारे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत लभाने यांना दिली. त्यांनी बडनेरा पोलिसांना घटनास्थळी बोलाविले. तामगाडगे कुटुंबीय गोव्याला आहे. बडनेरा ठाण्याचे उपनिरीक्षक अफुने ताफ्यासह घटनास्थळी पोहोचल्या. कल्पेश मेंढे यांनी बडनेरा पोलिसांत तक्रार नोंदविली.
स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या मागील परिसरात मीनाक्षी अपार्टमेंट असून, शेजारीच जंगलाचा भाग आहे. या ठिकाणी अनेक टवाळखोरांचा ठिय्या आहे. विजयपथ कॉलनीतील पथदिवे सुध्दा अनेक दिवसांपासून बंद आहे. ते पथदिवे फोडण्यात आले आहेत.
फ्लॅटमध्ये राहतात दोन पोलीस अधिकारी
मीनाक्षी अपार्टमेंटमध्ये १० फ्लॅट असून, त्यापैकी दोन फ्लॅटमध्ये पोलीस उपनिरीक्षक राहतात. शुक्रवारी रात्री सर्व कुटुंबीय आपआपल्या घरी असताना चोरांनी हा डाव साधला. मात्र, चोरीची भनक कोणाला लागली नाही. सकाळी उठल्यानंतर बाहेरून दार असल्यामुळे सर्वांची ताराबंळ उडाली होती.