शिक्षणमंत्र्यांचा पुतळा जाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 12:22 AM2017-12-12T00:22:28+5:302017-12-12T00:22:47+5:30
विद्यापीठांमध्ये मार्च २०१७ मध्ये नवा सार्वत्रिक विद्यापीठ कायदा लागू झाला आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी मात्र होत नसल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सोमवारी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून राज्य शासनाचा निषेध नोंदविला.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : विद्यापीठांमध्ये मार्च २०१७ मध्ये नवा सार्वत्रिक विद्यापीठ कायदा लागू झाला आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी मात्र होत नसल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सोमवारी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून राज्य शासनाचा निषेध नोंदविला.
स्थानिक राजकमल चौकात अभाविपने ‘राज्य सरकारचे डोके ठिकाणावर नाही काय?’ या घोषाने परिसर दणाणून सोडला. सेमिस्टर पॅटर्न परीक्षा पद्धतीचा समावेश नसताना राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे विद्यापीठ त्याची अंमलबजावणी करीत आहे. छात्र संघाच्या निवडणुका खुल्या पद्धतीने घेण्यात याव्यात, यासाठी अभाविप सातत्याने पाठपुरावा करीत आहे. मात्र, राज्य सरकार व्यवस्थापन परिषदेत दोन सदस्य वाढविण्यासाठी छात्रसंघ निवडणूक ‘सिलेक्शन’ पद्धतीने घेत आहे. ही बाब विद्यार्थी संघटनांसाठी अन्यायकारक असल्याचा आरोप रवि दांडगे यांनी केला. यानंतर आंदोलनकर्त्यांनी ना. विनोद तावडे यांच्या प्रतीकात्मक पुतळा जाळला. विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये सेमिस्टर पॅटर्न बंद व्हावे, छात्र संघ निवडणुकीत मतदान पद्धतीचा समावेश करण्यात यावा, विद्यार्थ्यांना रखडलेली शिष्यवृत्ती त्वरेने मिळावी, अशी मागणी करण्यात आली.
राज्य शासनाच्या कारभारामुळे शैक्षणिक धोरणाची वाट लागली असल्याचे सांगत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने शासनाच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली. विद्यापीठात नव्या कायद्यानुसार कारभार चालत नसताना राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे स्वस्थ बसले आहेत, असा त्यांचा आरोप होता. यावेळी अभाविपचे ज्ञानेश्वर खुपसे, शाश्वत वार्इंदेशकर, शिवानी मोरे, प्रथमेश अंबरखाने, जंयत इंगळे, विक्की पांडे, अनिकेत निकम, वैभव शिलणकर, सौरभ लांडगे, अबोली पांचाळ, मेधना खंडेलवाल, प्रीती गवलीकर, सृष्टी राजगिरे आदी उपस्थित होते.