विदर्भात पाणवठ्यांवर ‘जागते रहो’, व्याघ्र प्रकल्पांवर तस्करांची नजर; राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाकडून सूचना
By गणेश वासनिक | Published: March 9, 2024 07:03 PM2024-03-09T19:03:21+5:302024-03-09T19:04:41+5:30
‘लिट्मस’ पेपरचा नियमित करा वापर; नैसर्गिक, कृत्रिम पाणवठ्यांवर वन कर्मचारी तैनात
अमरावती : उन्हाळ्यात वाघांना तृष्णा भागविण्यासाठी जंगलात भटकंती करावी लागते. नेमकी हीच बाब हेरून व्याघ्र तस्कर हे वाघांच्या शिकारीसाठी सज्ज होत असतात. विशेषत: एप्रिल, मे महिन्यात व्याघ्र प्रकल्पात पाणवठ्यांवर वाघांच्या विषप्रयोगाची भीती असून, विदर्भातील वन कर्मचाऱ्यांना ‘जागते रहो’च्या सूचना राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाकडून देण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने व्याघ्र प्रकल्पांचे क्षेत्र संचालक ‘अलर्ट’ झाले आहेत.
व्याघ्र तस्करांकडून वाघांच्या शिकारीसाठी जंगलात लोखंडी ट्रॅप लावणे, पाणवठ्यावर विषप्रयोेग करण्याच्या घटना यापूर्वी निदर्शनास आल्या आहेत. तस्करांची ही मोहीम फत्ते झाल्यास वाघांच्या विविध अवयवांची आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्री केली जाते. दिल्ली, नेपाळ मार्गे चीनपर्यंत व्याघ्र तस्करीचे कनेक्शन असल्याचे दिल्ली येथील वन्यजीव नियंत्रण ब्युरोने यापूर्वीच उघडकीस आणले आहे. विदर्भातील वाघांवर मध्य प्रदेशातील बहेलिया, तर पंजाबच्या बावरिया टोळ्यांचे लक्ष आहे. त्यामुळे विदर्भातील मेळघाट, ताडोबा-अंधारी, पेंच, नवेगाव-नागझिरा, बोर, टिपेश्वर या अभयारण्यानजीकच्या गावांमध्ये संशयास्पद अथवा परप्रांतीय व्यक्ती दिसल्यास स्थानिक पोलिसांना तत्काळ माहिती देण्याच्या सूचना व्याघ्र प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांना मिळाल्याची विश्वसनीय माहिती आहे. गतवर्षी २७ जून २०२३ रोजी गडचिरोलीनजकीच्या आंबेशिवणी येथे व्याघ्र शिकारीच्या साहित्यासह संशयित सहा पुरुष, पाच महिला, पाच लहान मुलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, हे विशेष.
...‘त्या’ पाणवठ्यांवर टँकरने पाणीपुरवठा
व्याघ्र प्रकल्पात नैसर्गिक, कृत्रिम पाणवठ्यात पाणी समस्या उद्भवल्यास प्रसंगी टँकरने पाणीपुरवठा करावा, असे निर्देश वन्यजीव विभागाच्या वरिष्ठांनी दिले आहेत. सोलर नसलेल्या पाणवठ्यावर वाघांची तहान भागविण्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात येणार आहे. पाण्याअभावी वन्यप्राण्यांचे मृत्यू होता कामा नयेत, अशी गाइडलाइन आहे. पाणवठ्यांच्या नियमित तपासणीसाठी लिट्मस पेपरचा वापर अनिवार्य केला आहे, तर नैसर्गिक, कृत्रिम पाणवठ्यांवर वनकर्मचारी तैनात करण्याच्या सूचना आहेत.
पाणवठ्यांची लिटमस पेपरने नियमित तपासणी केली जाते; मात्र उन्हाळ्यात याविषयी विशेष काळजी घेतली जाते. ज्या ठिकाणी सोलर वीज उपलब्ध नाही, अशा पाणवठ्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणवठ्यांची देखभाल, तपासणीसाठी बीटनिहाय वनकर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. - मनोजकुमार खैरनार, उपवनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्राईम सेल.