रात्री करायची चोरी, दिवसा त्याच पैशावर मज्जा; तीन सराईत घरफोडे जेरबंद
By प्रदीप भाकरे | Published: May 22, 2024 07:45 PM2024-05-22T19:45:12+5:302024-05-22T19:45:29+5:30
पाच गुन्हे उघडकीस, जिल्ह्यासह तेल्हारा, अकोटला केली चोरी
अमरावती: एका गावात राहून रात्री घरफोडी व दिवसा त्या पैशांवर मौजमजा करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या युनिट एकने २० मे रोजी अटक केली. त्यांच्याकडून घरफोडीचे पाच गुन्हे उघडकीस आणून ५ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. घरफोड्यांचा एक साथीदार फरार असून त्याचा कसून शोध सुरू आहे. तेजस संजय दरेकर (२२, रा. रवीनगर, कांडली, परतवाडा), वीरेंद्र सोभाराम नागेश्वर (४०, रा. किरपाणी, बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) व अमोल सुरेश देशमुख (३६, रा. मार्की, भातकुली) अशी अटक करण्यात आलेल्या घरफोड्यांची नावे आहेत. तर रोशन सरदार रा. परतवाडा असे फरार आरोपीचे नाव आहे.
वलगाव ठाण्याच्या हद्दीतील ग्राम मार्की येथे अमोल देशमुख याच्या घरी गेल्या काही दिवसांपासून अनोखळी तिघे राहत असून ते रात्रीच्या वेळी बाहेर जातात व दिवसा घरी असतात. ते पैशांची उधळण करून मौजमजा करतात, अशी माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकला मिळाली. या माहितीच्या आधारावर गुन्हे शाखेच्या पथकाने अमोल देशमुख याच्या घरी धाड टाकली. यावेळी तेथून तेजस दरेकर, वीरेंद्र नागेश्वर व अमोल देशमुख यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे घरफोडीसाठी वापरण्यात येणारे दोन पेचकस, टॉमी, सब्बल असे साहित्य मिळून आले. चौकशीत त्यांनी साथीदार रोशन सरदार रा. परतवाडा याच्यासोबत मिळून काही दिवसांपूर्वी अमरावती येथील श्री गजाननधाम, रेवसा, चांदूरबाजार, अकोट, शेगाव, तेल्हारा इत्यादी ठिकाणी घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
कारागृहात झाली ओळख
रोशन व तेजस हे दोघे मित्र असून काही दिवसांपूर्वी एका गुन्ह्यात कारागृहात असताना त्यांची ओळख वीरेंद्र नागेश्वरसोबत झाली. कारागृहामधून सुटल्यावर ते वीरेंद्रच्या संपर्कात होते. त्यावेळी वीरेंद्रने तो मार्की येथे मित्र अमोल देशमुख याच्या घरी राहायला असल्याचे सांगितले. त्यामुळे रोशन व तेजस हे त्याला भेटण्यासाठी तेथे गेले. त्यावेळी अमोलचा मोठा भाऊ खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात असल्याचे वीरेंद्रने त्यांना सांगितले. तेथून त्यांची ओळख होऊन चौघेही मार्की येथे राहत होते. ते दिवसा गावात राहायचे व रात्री चोरी करायचे, असे तपासात समोर आले. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची दाट शक्यता आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात साहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश झोपाटे, राजूआप्पा बाहेनकर, फिरोज खान, सतीख देशमुख, दिनेश नांदे, विकास गुडदे, सूरज चव्हाण, निखिल गेडाम, निवृत्ती काकड, रोशन माहुरे, किशोर खेंगरे यांनी केली.