आजपासून जिल्ह्यात ‘स्टिम’ सप्ताहाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:11 AM2021-04-26T04:11:28+5:302021-04-26T04:11:28+5:30
अमरावती : कोरोना प्रतिबंधक त्रिसूत्रीच्या पालनाबरोबरच चांगला आहार, कोविड सुसंगत जीवनशैली, नियमित वाफ घेणे आदींचा अवलंब केला पाहिजे. त्याबाबत ...
अमरावती : कोरोना प्रतिबंधक त्रिसूत्रीच्या पालनाबरोबरच चांगला आहार, कोविड सुसंगत जीवनशैली, नियमित वाफ घेणे आदींचा अवलंब केला पाहिजे. त्याबाबत जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाकडून स्टीम सप्ताह २६ एप्रिल ते २ मे दरम्यान राबविण्यात असून, सर्वांनी तो यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी केले.
साथीचे संक्रमण रोखण्यासाठी कोविड सुसंगत जीवनशैली, नियमित वाफ घेणे आदी बाबींचे पालन नागरिकांकडून पालन होणे आवश्यक आहे. या विविध आरोग्यतज्ज्ञांच्या सूचनांनुसार जिल्ह्यात स्टीम सप्ताह राबविण्याचा निर्णय पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत झाला. त्यानुसार ग्रामीण आरोग्य यंत्रणेकडूनही गावोगावी "चला वाफ घेऊ या, कोरोनाला हरवूया " या सप्ताहाची अंमलबजावणी होत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी दिली.
पालकमंत्र्यांच्या आवाहनानुसार प्रत्येक तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना मोहिमेबाबत सूचना देण्यात आली आहे व सोमवारपासून गावोगाव हे अभियान राबविण्यात येईल, असेही डॉ. रणमले यांनी सांगितले. ते म्हणाले की, कोरोना विषाणूला हरविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. वाफ घेण्यासारखी बाब आपल्याला तशी परिचित आहे. सध्याच्या काळात तिचे महत्त्व मोठे आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून तिचे महत्त्व प्रत्येकाच्या मनावर बिंबवण्यासाठी उपयोग होणार आहे. यानिमित्ताने प्रत्येकाने मी कोरोनाला हरविणारच हा निर्धार केला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
बॉक्स
अशी करावी प्रक्रिया
वाफ घेण्याबरोबरच व्हिटॅमिन सी गोळया, झिंक गोळ्या व मल्टिव्हिटॅमिन गोळ्या घेण्याबाबत आहार व योग करण्याबाबतही विविध आरोग्यतज्ज्ञांनी सुचविले. दिवसातून तीन वेळा वाफ घ्यावयाची आहे व नाकाव्दारे वाफेस श्वासाव्दारे शरीरात ओढणे व तोंडाने बाहेर सोडायची ही प्रक्रिया १० वेळा करावयाची आहे. या प्रक्रियेकरिता दोन किंवा तीन मिनिटे लागतात. तसेच साध्या पाण्याने वाफ घेतली तरीही उत्तम आहे.
बॉक्स
त्रिसूत्रीचे पालनही महत्त्वाचे
प्रत्येक घरातून त्याचा कायमचा समूळ नायनाट करण्याचा प्रयत्न "स्टीम सप्ताह" राबवून आपल्याला करायचा आहे. मास्क लावणे, अंतर ठेवणे, हात धुणे, सॅनिटायझरचा वापर, तसेच प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पोषक आहार, व्यायाम, सुसंगत जीवनशैलीचा अवलंब यात वाफ घेणे ही कृतीही समाविष्ट आहे, असेही डॉ. रणमले यांनी सांगितले.