एका हातात स्टेअरिंग, दुसऱ्या हातात मोबाइल; हजारांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 11:20 AM2024-09-14T11:20:30+5:302024-09-14T11:21:54+5:30
१.३२ लाख चालकांना दंड : अनपेड चालानची रक्कम सहा कोटींवर
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : डिजिटलच्या जमान्यात स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र, वाहन चालवताना त्याचा वापर करणे महागात पडू शकते. तरीही, बरेच लोक गाडी चालवताना कॉल किंवा मेसेज करण्यासाठी त्याचा वापर करतात. लोक वाहन चालवताना सोशल मीडिया तपासण्यासाठीही फोन वापरतात. पण, तुम्हाला माहीत आहे का की गाडी चालविताना मोबाइल वापरणे हा कायदेशीर गुन्हा आहे आणि त्यासाठी तुम्हाला दंडसुद्धा होऊ शकतो.
अमरावती ग्रामीण पोलिसांनी जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्या एकूण ४२८ वाहनधारकांना ४ लाख ५६ हजार रुपये दंड आकारला. मात्र, केवळ सहा जणांनी सात हजार रुपये दंड भरला. तर, ४२२ वाहनचालकांनी ४.४९ लाख रुपये दंडाकडे पाठ फिरविली. तो दंड अनपेड राहिला.
आठ महिन्यांत
९४ लाख वसूल आठ महिन्यांत एकूण ७ कोटी ३ लाख ८४ हजार रुपये दंड आकारण्यात आला. मात्र, केवळ ३४ हजार ८५९ वाहनचालकांनी ९४ लाख ६ हजार २०० रुपये दंड भरला. तर, ९७ हजार ३१० वाहनचालकांनी दंडाकडे पाठ फिरविली.
मोबाइलवेड्यांना ४.५६ लाखांचा दंड
ग्रामीण वाहतूक पोलिसांनी जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत ४२८ मोबाइलवेड्या चालकांना ४ लाख ५६ हजार रुपये दंड ठोठावला. यात दुचाकीचालकांसह चारचाकीचालकही आहेत. ते मोबाइलधारक वाहनचालक अपघातांसाठी कारणीभूत ठरतात.
२३ हजार वाहनचालक सिटबेल्टविना
जानेवारी ते ऑगस्टदरम्यान तब्बल २३ हजार ९०६ वाहनचालक सिटबेल्टविना आढळले. त्यांना ५१ लाख ४७ हजार रुपये दंड आकारण्यात आला. पैकी केवळ १५ हजार वाहनचालकांनी ३१ लाख ८६ हजार ४०० रुपये दंड भरला.
"ऑगस्टअखेरपर्यंत १ लाख ३२ हजार वाहनचालकांना एकूण ७ कोटींहून अधिकचा दंड आकारण्यात आला. पैकी ९४ लाख रुपये वसूल करण्यात आले. अनपेड चालानची रक्कम ६ कोटींवर पोहोचली आहे."
- सतीश पाटील, पोलिस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा