वरिष्ठ महिला आयपीएसकडे चौकशीचे सुकाणू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:13 AM2021-04-04T04:13:34+5:302021-04-04T04:13:34+5:30
परतवाडा : आरएफओ दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास अपर पोलीस महासंचालक तथा महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माणच्या सहव्यवस्थापकीय संचालक ...
परतवाडा : आरएफओ दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास अपर पोलीस महासंचालक तथा महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माणच्या सहव्यवस्थापकीय संचालक प्रज्ञा सरवदे या करणार आहेत. ३० एप्रिलपर्यंत संपूर्ण प्रकरणाचा तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांना शासनाकडून देण्यात आले आहेत.
गुगामल वन्यजीव विभागाचा उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याने वेळोवेळी दिलेल्या मानसिक त्रासामुळे २५ मार्च रोजी रात्री ७ वाजता आरएफओ दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येस विनोद शिवकुमार कारणीभूत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यावर त्याच्याविरुद्ध धारणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. २६ मार्चच्या आदेशान्वये निलंबित करण्यात आले. तो सध्या अमरावती कारागृहात आहे. शिवकुमार इतकेच श्रीनिवास रेड्डी हेदेखील दीपाली यांच्या आत्महत्येला जबाबदार असल्याने त्यांच्याविरुद्ध देखील गुन्हा दाखल करून योग्य कारवाई करावी, असे विविध संघटनांनी निवेदनात नमूद केले आहे. उपरोक्त पार्श्वभूमीवर श्रीनिवास रेड्डी यांनी विहित कर्तव्य व जबाबदाऱ्यांचे अनुपालन न केल्याची बाब दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरली किंवा कसे याबाबत सखोल चौकशी करून आपला अहवाल शासनाला ३० एप्रिलपर्यंत सादर करण्याचे आदेश एका पत्राद्वारे मुख्य वनसंरक्षक अरविंद आपटे यांनी दिले आहे.