अमरावतीत आंदोलकांवर लाठीचार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 06:00 AM2020-01-25T06:00:00+5:302020-01-25T06:00:53+5:30
एनआरसी, सीएएच्या विरोधात इर्विन चौकात १३ जानेवारीपासून सत्याग्रह आंदोलन सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या मुद्द्यावर २४ जानेवारीला महाराष्ट्र बंद पुकारला. त्याला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. दुपारी ११ च्या सुमारास शेकडो आंदोलक इर्विन चौकात एकत्र आले. येथे नारेबाजी करून प्रथम ठिय्या दिला. त्यानंतर व्यापारी प्रतिष्ठाने बंद करण्यासाठी मालवीय चौकाच्या दिशेने कूच केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात शुक्रवारी पुकारण्यात आलेल्या अमरावती बंदला हिंसक वळण लागले होते. आंदोलकांनी व्यापारी प्रतिष्ठाने जबरीने बंद करण्याच्या प्रयत्नात दगड भिरकावल्याने पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. यामध्ये पाच आंदोलक जखमी झाले, १५ आंदोलकांना पोलिसांनी डिटेन केले.
एनआरसी, सीएएच्या विरोधात इर्विन चौकात १३ जानेवारीपासून सत्याग्रह आंदोलन सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या मुद्द्यावर २४ जानेवारीला महाराष्ट्र बंद पुकारला. त्याला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. दुपारी ११ च्या सुमारास शेकडो आंदोलक इर्विन चौकात एकत्र आले. येथे नारेबाजी करून प्रथम ठिय्या दिला. त्यानंतर व्यापारी प्रतिष्ठाने बंद करण्यासाठी मालवीय चौकाच्या दिशेने कूच केली. मर्च्युरी पॉइंटजवळील व्यापारी प्रतिष्ठाने बंद करण्यासाठी आरडाओरड, घोषणाबाजी केली. व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठाने बंद करण्यास सुरुवात केली. याच सुमारास एका आंदोलकाने रस्त्यावरील दगड प्रतिष्ठानावर भिरकावला. तैनात पोलिसांनी तात्काळ आंदोलकांकडे धाव घेतली. पोलिसांना विरोध सुरू झाल्यावर त्यांनी लाठीचार्ज केला. यामुळे काही आंदोलक पांगले. पोलिसांनी लाठ्यांचा धाक दाखवित त्यांना ताब्यात घेतले. या आंदोलकांना वसंत हॉल येथे नेण्यात आले. पोलिसांनी दुपारी ३ नंतर सर्वांना मुक्त केले.
डिटेन केलेल्या आंदोलकांमध्ये अलीम पटेल, दिनेश भटकर, अनिल फुलझेले, राजेश गोले, किरण गुडधे, प्रमोद इंगळे, अमित वानखडे, सुरेश तायडे, अविनाश नवाडे, सैयद रेहान, बाबाराव गायकवाड, सिद्धार्थ देवरे, हरिदास दंदे यांचा समावेश आहे. आंदोलनाची शहरात चर्चा होती.
पाच आंदोलक जखमी
पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये मोहम्मद तौसीफ मोहम्मद सलाम (३५, रा. छायानगर), मोहम्मद अकील मोहम्मद वकील (४५), राजेश जानराव गोले (४३), अनिल भीमराव फुलझेले (३६,रा. फ्रेजरपुरा) आणि दिनेश साहेब भटकर (२७, रा. खारतळेगाव) हे पाच आंदोलक जखमी झाले. या आंदोलकांना जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी आणले गेले.
पोलिसांचा मोठा ताफा
इर्विन चौकात सुरू असलेल्या सत्याग्रह आंदोलनाला पोलीस बंदोबस्त आहे. त्यातच अमरावती बंदसाठी पोलिसांनी शुक्रवारी विशेष बंदोबस्ताचे नियोजन केले होते. आंदोलकांसोबत पोलिसांचा ताफा चालत होता. यादरम्यान संघर्ष झाल्यामुळे बंदोबस्तातील सर्व पोलीस आंदोलकांच्या दिशेने धावून गेले. त्यांना ताब्यात घेतले. यावेळी पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, शशिकांत सातव यांनी स्थिती हाताळली. कोतवालीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे, गाडगेनगरचे निरीक्षक मनीष ठाकरे, एपीआय, पीएसआय, पोलीस हवालदार आणि अतिशीघ्र कृती दल उपस्थित होते.
बससेवा ठप्प
अमरावती बंदमुळे महापालिकेच्या शहर बससेवा बंद ठेवण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना, विशेषत: शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बस बंदचा मोठा फटका बसला. अनेक चौकांमध्ये विद्यार्थी बसची प्रतीक्षा करीत होते. मात्र, बस न आल्याने विद्यार्थ्यांना पैसे खर्चून ऑटोरिक्षातून प्रवास करावा लागला.
पोलीस अधिकाऱ्याची प्रकृती बिघडली
आंदोलकांना ताब्यात घेताना धावपळीत गाडगेनगर ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याचा श्वास भरून आला होता. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणले गेले. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार केला. प्रकृतीत सुधारणा झाली आहे.