देवी विसर्जनात लाठ्या काठ्या, तलवारी,अन् आगीचे टेंभे; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 12:42 PM2022-10-07T12:42:46+5:302022-10-07T12:44:02+5:30
सदस्य व कार्यकर्त्यांविरुद्ध कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यात चार लोखंडी तलवारी व दोन काठ्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.
परतवाडा: शहरातील देवी विसर्जन मिरवणुकी दरम्यान मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आखाड्यातील तलवारी लाठ्या-काठ्या आणि आगीचे टेंभे फिरवल्यावरून, परतवाडा पोलिसांनी मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्त्यांविरुद्ध कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यात चार लोखंडी तलवारी व दोन काठ्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.
परतवाडा येथील मॉ बिजासन नवदुर्गा उत्सव मंडळ पेन्शनपुराचे पदाधिकारी, सदस्य, व कार्यकर्ते गुरुवारला देवीचे विसर्जनाकरिता मिरवणुकीने जात होते. दरम्यान सायंकाळी अचलपूर नगर परिषदेच्या गेट समोर सार्वजनिक ठिकाणी ते तलवारी, लाठ्या काठ्या, आगीचे टेंभे असलेली लोखंडी रिंग आणि टेंभे जवळ बाळगून असल्याचे व फिरवताना पोलिसांना दिसून आलेत. जीवित हानी होण्याची शक्यता व जिल्हाधिकाऱ्यांचा मनाई हुकूम विचारात घेत परतवाडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष ताले यांनी कायदेशीर फिर्याद नोंदविली. या फिर्यादीत ठाणेदारांनी मंडळाचे पदाधिकारी व सदस्य राम सुरेश बघेल, निखिल डायलकर, आकाश जानरावजी भुते, मुकेश उज्जैनकर, उदेश पांडे, योगेश नरेश गुप्ता व इतर कार्यकर्त्यांविरुद्ध ही फिर्याद नोंदविली आहे.
२० देवींचे विसर्जन
गुरुवारला परतवाडा शहरातील २० दुर्गादेवींचे विसर्जन केल्या गेले. मिरवणुकीने मोठ्या उत्साहात नियमावलीचे पालन करीत मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हे विसर्जन पार पाडले. ठाणेदार संतोष ताले स्वतः या दरम्यान बंदोबस्तात पेट्रोलिंगवर होते. विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने फिक्स पॉईंट बंदोबस्त नेमण्यात आला होता.