पुलगाव येथील चोरी गेलेले बियाणे चांदूर रेल्वेत पकडले, दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 22:05 IST2023-06-27T21:19:48+5:302023-06-27T22:05:19+5:30
नॅशनल सीट कॉर्पोरेशनचे तूर व अंकुर कंपनीचे सोयाबीनचे बियाणे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पुलगाव येथील चोरी गेलेले बियाणे चांदूर रेल्वेत पकडले, दोघांना अटक
चांदूर रेल्वे : लगतच्या गौरखेडा येथील पारधी वसाहतीमधील राहुल ऊर्फ गणपत सुबर भोसले याच्या घरातून सोयाबीन व तूर बियाणांच्या ४० ते ५० बॅग चांदूर रेल्वे पोलिसांनी मंगळवारी जप्त केल्या. हे बियाणे पुलगाव येथील चोरल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आलेली असून, मंगळवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.
नॅशनल सीट कॉर्पोरेशनचे तूर व अंकुर कंपनीचे सोयाबीनचे बियाणे असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुप्त माहितीच्या आधारे राहुल भोसले यांच्या घरी पोलिसांनी धाड टाकली असता राहुल हा अन्य व्यक्तीच्या घरी बियाणे बॅगा लपवीत होता. याप्रकरणी राहुल भोसले व त्याचा साथीदार सागर रतन पवार (वय २२) याला पोलिसांनी अटक केली आली आहे.
बियाणाच्या पडताळणीसाठी पंचायत समितीचे कृषी अधिकारी खोब्रागडे यांना बोलावून जप्त बियाणे कोणत्या कंपनीचे व किती आहेत, याची चौकशी करण्यात येत आहे. हे बियाणे चारचाकी (क्रमांक एमएच- ३४, एव्ही- ०५५८) या वाहनातून आणण्यात आलेले आहे. हे वाहन पोलिसांनी जप्त केले. ठाणेदार पंकज दाभाडे यांच्या मार्गदर्शनात चांदूर रेल्वे पोलिस पुढील तपास करीत आहेत.