एसबीआयच्या आणखी दोन खात्यांतून चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 11:49 PM2017-10-24T23:49:13+5:302017-10-24T23:49:25+5:30
स्टेट बँकेच्या खात्यांमधून परस्पर रक्कम काढून घेतली जात असल्याच्या धक्क्यातून खातेदार सावरले नसतानाच आता पुन्हा दोन खात्यांवर चोरांनी डल्ला मारला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्टेट बँकेच्या खात्यांमधून परस्पर रक्कम काढून घेतली जात असल्याच्या धक्क्यातून खातेदार सावरले नसतानाच आता पुन्हा दोन खात्यांवर चोरांनी डल्ला मारला. या घटनेमुळे एसबीआयच्या खात्यांत रक्कम किती सुरक्षित, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
नवसारी परिसरातील रहिवासी विष्णू श्यामराव बारब्दे यांच्या एसबीआय खात्यातून ३५ हजारांची रक्कम चोरण्यात आल्याची घटना मंगळवारी समोर आली. यासंदर्भात त्यांनी एसबीआयला तक्रार देऊन गाडगेनगर पोलिसांकडे धाव घेतली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातूनही एका खातेदाराची रक्कम परस्पर काढल्याची विश्वसनीय माहिती आहे. शहरात सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण बँकांच्या विश्वासर्हतेवर परिणाम करीत असून, खातेदारांची संपत्तीही धोक्यात आली आहे.
शहरात लाखो नागरिकांची विविध बँकांमध्ये खाती असून, त्यामध्ये कोट्यवधींची संपत्ती जमा आहे. सद्यस्थितीत शहरातील स्टेट बँकेच्याच खात्यातून रक्कम काढण्यात आल्याच्या घटना समोर येत आहेत. त्या अनुषंगाने सायबर सेलने केलेल्या चौकशीदरम्यान शहरातील एसबीआयच्या काही एटीएममध्ये स्किमर व कॅमेरा लावून खातेदारांची माहिती लीक केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले. ही रक्कम हरियाणा, गुडगाव व आसाम येथून काढण्यात आल्याची पुष्टी झाली असली तरी पोलिसांचे 'लांब' हात अद्याप गुन्हेगारांपर्यंत पोहोचले नाहीत.
यांच्या खात्यातून काढली रक्कम
जयवंत इंदूरकर (३२, रा. महेंद्र कॉलनी) यांच्या खात्यातून १ लाख ६० हजार, सरस्वती नगरातील रहिवासी संतोष किरनाके यांच्या खात्यातून ६४ हजार ५०० व एका महिलेच्या खात्यातून १ लाख २० हजार उडविण्यात आले. या तिन्ही घटना १२ ते १३ आॅक्टोबरदरम्यान घडल्या. या तिघांचे बँक खाते राठीनगरातील एसबीआय शाखेत आहेत. बडनेरा येथील अरुण बेलखेडे यांच्या खात्यातून १ लाख ६० हजार रुपये १३ ते १४ आॅक्टोबर दरम्यान काढण्यात आले. विनोद माणिक करंडे (रा.बारीपुरा, बडनेरा) यांच्या एसबीआयच्या चांदूर रेल्वे शाखेच्या खात्यातून १ लाखाची रक्कम काढण्यात आली. १५ ते १६ आॅक्टोबर दरम्यान हा प्रकार घडला. त्याचप्रमाणे शहरातील रहिवासी व मोर्शीत नोकरी करणारे शेख हनिस अब्दुल हमीद यांच्या मोर्शीतील एसबीआय खात्यातील ६० हजारांची रक्कम १६ ते १७ आॅक्टोबर दरम्यान राजस्थानमधील एटीएममधून परस्पर काढण्यात आली आहे. चंदननगरातील रहिवासी गोपाल विनायक इंगळे यांच्या बँक खात्यातून २७ सप्टेंबरपर्यंत १ लाख २७ हजारांची रक्कम लंपास झाली.
खातेदारांनो सावधान!
एसबीआयच्या खातेदारांची माहिती लीक झाल्याचे सायबर सेलने स्पष्ट केले असून, गुन्हेगारांनी एटीएममध्ये स्किमर व कॅमेरा लावून खातेदारांची माहिती घेतल्याचे निदर्शनास आले आहे. एसबीआय खातेदारांनी आता सावध होण्याची गरज आहे. तपासाच्या अनुषंगाने काही एटीएमचे सीसीटीव्ही फुटेज पोलीस गोळा करीत आहेत.