तिवसा येथील शंकरपटात खासदारांवर दगडफेक, नक्की काय आहे प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 11:45 AM2023-11-27T11:45:40+5:302023-11-27T11:48:43+5:30
पोलिस ठाण्यात कार्यकर्त्याकडून तक्रार, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
तिवसा (अमरावती) : राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्यावर तिवसा येथे आयोजित शंकरपटात दगडफेक करण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी तिवसा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. तिवसा येथील नवीन न्यायालयाच्या मागे असलेल्या खुल्या मैदानात महाराष्ट्र ग्रामदर्पण व रविराज देशमुख मित्रपरिवारतर्फे शंकरपटाचे आयोजन २३ ते २५ नोव्हेंबर दरम्यान करण्यात आले होते. या शंकरपटाला २५ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास खा. बोंडे यांनी कार्यकर्त्यांसमवेत भेट दिली.
शंकरपटाच्या मैदानाची पाहणी करून व्यासपीठाकडे कार्यकर्त्यांसमवेत जात असताना खा. बोंडे यांच्या दिशेने नागरिकांच्या घोळक्यातून अज्ञात व्यक्तींनी दगड भिरकावले. याबाबत महाराष्ट्र ग्रामदर्पणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध देशमुख यांनी तिवसा ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून तिवसा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ड्रोन कॅमेऱ्याची मदत...
दगडफेक करणारा नेमका कोण, याचा मागमूस अद्याप लागला नसून ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून दगडफेक करणाऱ्या अज्ञाताचा पोलिस प्रशासन शोध घेत आहे. दरम्यान, पाठीमागून केलेला हा भ्याड हल्ला असल्याचे सांगत खा. बोंडे यांनी या प्रकरणातील दोषीला पुढे येण्याचे आव्हान दिले. पोलिस तपास करतील आणि आरोपींना हुडकून काढतील, असा विश्वासदेखील त्यांनी ‘लोकमत’शी रविवारी बोलताना व्यक्त केला.