पाषाण भिंती क्षणभर झाल्या नि:शब्द
By admin | Published: July 2, 2017 12:11 AM2017-07-02T00:11:47+5:302017-07-02T00:11:47+5:30
उत्तुंग भिंतीआड शिक्षा भोगणाऱ्या आपल्या पित्याला भेटण्याची ओढ.. थोडेसे डोळे पाणावले.....
कैद्यांची पाल्यांसोबत गळाभेट : भावसोहळ्याने अधिकारी देखील भारावले
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : उत्तुंग भिंतीआड शिक्षा भोगणाऱ्या आपल्या पित्याला भेटण्याची ओढ.. थोडेसे डोळे पाणावले.. हातून कळत- नकळत झालेल्या चुकांचे प्रायश्चित शिक्षेच्या रुपात भोगणारे कैदी... पोटच्या गोळ्यांना कधी पाहतो नी कधी नाही, या आतुरतेने प्रतीक्षेत असताना मुले-वडिल समोरासमोर आले आणि कारागृहाच्या पाषाण भिंती क्षणभर नि:शब्द झाल्यात. या भावसोहळ्याने अधिकारी, कर्मचारी देखील भारावून गेले. शनिवारी कारागृहात आयोजित ‘गळाभेट’ अभिनव उपक्रमांचे भावविभोर प्रसंग मनाचे हुंदके वाढविणारे ठरले.
राज्य शासन गृहविभाग कारागृह प्रशासनाच्यावतीने मध्यवर्ती कारागृहांमध्ये शिक्षाधीन बंद्यासाठी ‘गळाभेट’ हा उपक्रम घेण्यात आला. कारागृह अधीक्षक रमेश कांबळे आणि कैद्यांच्या पुनर्वसनाकरिता कार्यरत ‘वऱ्हाड’ संस्थेच्या पुढाकाराने हा उपक्रम पार पडला. मध्यवर्ती कारागृहात प्रदीर्घ शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांची त्यांच्या पाल्यांसोबत ‘गळाभेट’ व्हावी, हा मुख्य उद्देश यामागील होता. कारागृहात उत्तुंग भिंतीआड शिक्षा भोगणाऱ्या पित्याला पहिल्यांदाच पाहण्याचा योग काही मुलांना आला. काहींचे डोळे पाणावले तर काहींनी घरीची ख्याली खुशहाली जाणून घेताना मुलांना आलिंगन दिले. मुले कधी पित्याच्या कुशीत विसावली हे पाल्यांनाही कळले नाही. आई काय करते, काका घराकडे लक्ष देता की नाही? आजीची काळजी घे, आत्या सांग मी बरा आहे. अशा काहीशी समजदार, सामंजस्याने वडिलांनी घराबद्दल माहिती जाणून घेत असताना गावातील तो कसा आहे.. गमती.. जमती.. अन् पित्याच्या मांडीवर बसून काही आठवणीत पाल्य कसे रमून गेलेत हे कळलेच नाही. मात्र वडिलांना निरोप देताना पाषाण भिंतीही भावनांनी हा ओथंबलेला सोहळा बघून क्षणभर नि:शब्द झाल्या होत्या. पोटच्या गोळ्याला पाठमोरे पाहताना कैद्यांच्या भावना अनिवार झाल्या आणि ‘बाय- बाय’ करीत पाल्यांनी वडिलांपासून निरोप घेतला. यावेळी कारागृह अधीक्षक रमेश कांबळे, उपअधीक्षक भाईदास ढोले यांच्यासह तुंगाधिकारी पांडुरंग भुसारे, राजेंद्र ठाकरे, बी.एस. सदानशिव, एम.एम. चव्हाण, सी.आर. कदम, आर. एन. ठाकरे, गव्हाणे गुरुजी, वऱ्हाड संस्थेचे धनानंद नागदिवे, वनमाला महाजन, प्रमिला मेश्राम, जया खेरडे, वीना वऱ्हाडे, सूरज मेश्राम, मनोज गायकवाड, नामदेव सोनोने उपस्थित होते.
पाल्यांसोबत जेवण अन डोळ्यात अश्रू
कारागृहाच्या संत गाडगेबाबा प्रार्थना सभागृहात आयोजित ‘गळाभेट’ उपक्रमादरम्यान पाल्यांना वडिलांसोबत जेवणही दिले. काही वडिलांनी पाल्यांना घास भरविताना डोळ्यात अश्रू अन् आठवणींनीच्या हुंदक्यांना साठवून ठेवले. क्षणभर आपण घरीच असल्याचा कैद्यांना भास झाला आणि ‘गळाभेट’निमित्त्याने पाल्यासोबतची भेट घडवून आणल्याबद्दल त्यांनी कारागृह प्रशासनाचे मनस्वी आभारही मानले.
अंध सोनुचा कैदी आई-वडिलांसमवेत वाढदिवस
खुनाचा आरोपाखाली गजानन आणि इंदूबाई पारेकर हे पती- पत्नी अमरावती मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. मुळचे बुलडाणा येथील रहिवासी असलेले गजानन आणि इंदूबाई यांना ‘गळाभेट’ उपक्रमासाठी जन्मत: अंध असलेली सोनू नामक १६ वर्षीय मुलगी आली होती. शनिवारी सोनुचा वाढदिवस होता. कारागृह प्रशासनाने ‘गळाभेट’ची औचित्य साधून तिचा वाढदिवस कारागृहात साजरा केला. अंध सोनुच्या आई- वडिलांनी केक कापून तिला भरविला. वऱ्हाड संस्थेने सोनुला नवीन कपडे भेट दिले. कारागृह अधीक्षक रमेश कांबळे यांनी अंध सोनुला घड्याळ भेट दिली. योगिता लिलाधर पायधन हिने इयत्ता दहावीत ८० टक्के गुण पटकाविल्याबद्दल तिला घड्याळ भेट देण्यात आली.