दगडफेक प्रकरण; अटकेतील आरोपींची संख्या ३३ वर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 11:05 AM2024-10-10T11:05:08+5:302024-10-10T11:06:29+5:30
Amravati : 'तो' व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध आयटी अॅक्ट अन्वये गुन्हे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नागपुरी गेट पोलिस ठाण्यावर विशिष्टधर्मिय जमावाने ४ ऑक्टोबर रोजी रात्री तुफान दगडफेक करून वाहनांची तोडफोड केली होती. त्यात २१ पोलिस अधिकारी कर्मचारी जखमीदेखील झाले होते. या प्रकरणात आतापर्यंत ३३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणातील अन्य आरोपींचा कसून शोध सुरू आहे. त्यासाठी नागपुरी गेट पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके काम करीत असल्याची माहिती पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी बुधवारी दिली.
शुक्रवारी रात्री दगडफेक व तोडफोडीची घडल्यानंतर पोलिसांनी एकाला अटक केली होती. त्यानंतर व्हायरल व्हिडीओ व ठाण्याच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून त्यांची धरपकड सुरू केली. त्यानुसार, शनिवार ५ ऑक्टोबर व रविवार, ६ ऑक्टोबर या दोन दिवसांत पोलिसांनी २२ आरोपींना अटक केली. त्यानंतर या प्रकरणात आणखी १० आरोपींना अटक करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची अटक संख्या ३३ वर पोहोचली आहे. पैकी २४ आरोपींची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. अन्य आरोपींचा कसून शोध सुरू असल्याची माहिती सीपी रेड्डी यांनी बुधवारी दिली.
कट करून जमावाला भडकविले
उत्तर प्रदेशातील गाजियाबादस्थित दासनादेवी मंदिराचे महंत यती नरसिंहानंद सरस्वती यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांची ओळख पटविण्यात आली असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. आरोपींनी ते व्हिडीओ व्हायरल करून लोकांना भडकविण्याचे कृत्य केले. त्यामुळे या घटनेच्या गुन्ह्यात आयटी अॅक्ट अन्वये कलम वाढ करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली. व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या स्थानिकांसोबतच बाहेरच्या व्यक्तींचीही ओळख पटविल्याचे ते म्हणाले.