परतवाड्यात शेतकरी कर्जमाफीसाठी मनसेचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2017 12:16 AM2017-04-07T00:16:32+5:302017-04-07T00:16:32+5:30
शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे. या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी गुरुवारी दुपारी १२ वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने
१५० कार्यकर्त्यांना अटक : चांदूरबाजार नाक्यावर वाहनांच्या रांगा
परतवाडा : शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे. या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी गुरुवारी दुपारी १२ वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने परतवाडा-अमरावती महामार्गावरील चांदूरबाजार नाक्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची रांग लागली होती. पोलिसांनी ५० कार्यकर्त्यांना अटक करून नंतर त्यांची सुटका केली.
मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विजय पोटे यांच्या नेतृत्वात गुरुवारी झालेल्या रास्ता रोको आंदोलनात राष्ट्रीयीकृत बॅँकेतून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात यावी, अल्पभूधारक शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे, पाच एकर व पाच एकरापेक्षा जास्त शेती असणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश करावा. कृषी संबंधित शासनाने दिलेल्या योजनांचे नियम व अटी शिथील करावे, कृषी मंत्रालयाने राबविण्यात येणाऱ्या योजनांची पुस्तिका काढून शेतकऱ्यांना वितरित करण्यात यावी आदी मागण्यांसाठी आंदोलन छेडण्यात आले. जिल्हा उपाध्यक्ष तथा प्रभारी तालुका अध्यक्ष विजय पोटे, जिल्हाध्यक्ष संजय देशमुख, राहुल अतकरे, सचिन जिचकार,देवराव केदार, रितेश कडू, अंकुश जवंजाळ, सुधीर बदरके, श्याम पिसार, चेतन चौधरी, स्वप्निल सोलव, नीकेश उघडे, रुपेश शर्मा, अमोल भुयार, उमेश भुयार, प्रमोद चौधरी आदी आंदोलनात सहभागी होते. (तालुका प्रतिनिधी)
वाहनांच्या रांगा, अटक व सुटका
मनसे कार्यकर्ते रास्तारोको आंदोलनात उतरल्याने परतवाडा अमरावती मार्गावरील वाहनांची दुतर्फा रांगा लागल्या होत्या. त्यामुळे पोलीसांनी मनसे कार्यकर्त्यांना अटक करुन वाहतूक सुरळीत केली व नंतर सोडून देण्यात आले. आंदोलनादरम्यान शेतकरी हिताचे असल्याचे पाहून प्रवासातील काही शेतकरी वाहनातून आपला पाठींबा दर्शवित होते हे विशेष.