तृतीयपंथीयांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 12:15 AM2018-07-10T00:15:45+5:302018-07-10T00:16:23+5:30
शारीरिक, मानसिक व लैंगिक छळाचा आरोप करीत वहिदा नामक महिलेला अटक करा, अन्यथा आम्ही येथून हलणार नाही, असा पवित्रा तृतीयपंथीयांनी घेतला. सोमवारी ४० ते ५० तृतीयपंथीयांनी पोलीस आयुक्तालयात ठिय्या मांडला आणि यानंतर रास्ता रोको केल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शारीरिक, मानसिक व लैंगिक छळाचा आरोप करीत वहिदा नामक महिलेला अटक करा, अन्यथा आम्ही येथून हलणार नाही, असा पवित्रा तृतीयपंथीयांनी घेतला. सोमवारी ४० ते ५० तृतीयपंथीयांनी पोलीस आयुक्तालयात ठिय्या मांडला आणि यानंतर रास्ता रोको केल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. वहिदाला ताब्यात घेण्यास दिरंगाई झाल्यामुळे त्यांनी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांची भेट घेऊन व्यथा मांडली. आयुक्तांनी कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर वहिदाला घेऊन बडनेरा पोलिसांनी आयुक्तालय गाठले.
आम्रपाली निलू जोगी (३०, रा. निंभोरा वीटभट्टी) याच्या नेतृत्वात ५० तृतीयपंथीयांच्या जमावाने रविवारी दुपारी आयुक्तालय गाठून पोलीस आयुक्तांकडे तक्रार वजा निवेदन सोपविले. तृतीयपंथीय नसतानाही वहिदा नामक महिला तृतीयपंथीयांचा लैंगिक छळ करते. तिच्याकडील काही तरुणांना साडी परिधान करण्यास लावून रेल्वेतील प्रवाशांना पैसे मागण्यासाठी वहिदा पाठविते. ती गुन्हेगारीत सक्रिय असून, त्याच्या बळावर हवे ते करून घेते, असा गंभीर आरोप तृतीयपंथीयांनी पोलीस आयुक्तांकडे निवेदनातून केला. तृतीयपंथीयांनी ठिय्या देऊन वहिदाला अटक करण्याची मागणी रेटून धरली. सायंकाळपर्यंत पोलीस आयुक्तालय परिसरात त्यांचा ठिय्या होता. यादरम्यान वहिदाला अटक न केल्यामुळे त्यांनी आयुक्तालयापुढील रस्त्यावर आंदोलन छेडले. नारेबारी करीत मागणी बुलंद केली. फ्रेजरपुरा पोलिसांनीही तृतीयपंथीयांंना समजाविण्याचा प्रयत्न केला. अखेर बडनेरा पोलिसांनी वहिदाला ताब्यात घेऊन पोलीस आयुक्तालयात आणले. तिच्यावर प्रतिबंधक कारवाई केली.
तृतीयपंथीयांंमध्ये आम्रपाली जोगी, रेखा पाटील जोगी, प्रिया, सिनु, मंगला, रविना, मोगरा, सोनिया, खुशी, पप्पी, राजकुमारी, सोनू, रीतू, शामा, पिंकी, नगीना, कीर्ती, नीलिमा, साधना, पिंकीदादी, सलमा, चांदणी, सारिका, प्रेरणा, अन्वी, प्रीती, आचल आदींचा सहभाग होता.
रविवारी तृतीयपंथीयांच्या परस्परविरोधी तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी भादंविचे कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हे दाखल केले होते.
एक तृतीयपंथीय झाला एचआयव्ही पॉझिटिव्ह
गैरअर्जदार महिलेने एका तृतीतपंथीयाला एचआयव्हीच्या रुग्णाचे रक्त इंजेक्शनद्वारे दिल्याचा गंभीर आरोप तृतीतपंथीयांनी केला आहे. त्याची वाच्यता तृतीतपंथीयांनी पोलीस आयुक्तांसमोर केली. इंजेक्शन लावलेल्या त्या तृतीतपंथीयाची तपासणी केली असता, तो एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याची बाब पुढे आल्याचे तृतीयपंथीय सांगत आहेत.
वहिदा धावली पत्रकाराच्या मागे
वहिदाला ताब्यात घेऊन बडनेरा पोलीस आयुक्तालयात आले. यादरम्यान काही पत्रकार वहिदाचे फोटो-व्हिडिओ घेत होते. ही बाब लक्षात येताच वहिदा एका पत्रकाराला शिवीगाळ करीत त्याच्या अंगावर धावून गेली.
पोलीस आयुक्तांची तत्काळ दखल
तृतीतपंथीयांनी आपल्या छळाची व्यथा पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्यासमोर मांडली असता, त्यांनी तात्काळ दखल घेत बडनेरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद कुळकर्णी यांना सूचना दिल्या. वहिदा नामक महिला व तिच्यासोबत राहणाऱ्याची चौकशी करून कारवाईचे निर्देश दिले. वहिदासोबत काम करणाºया गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पकडण्यास त्यांनी सांगितले.