चोऱ्या रोखण्यासाठी अमरावती जिल्ह्यात आता गावखेड्यातील युवकांचे ‘जागते रहो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 11:53 AM2017-12-02T11:53:19+5:302017-12-02T11:55:08+5:30
वाढत्या चोऱ्यांमुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दहशत पसरली असताना, अचलपूर तालुक्यातील वडगाव फत्तेपूर येथे युवक संरक्षणासाठी पुढे आले आहेत. दररोज दहा-बारा युवकांची टोळी गावात गस्त घालते. हा अभिनव उपक्रम ग्राम सुरक्षा समितीमार्फत सुरू करण्यात आला. परिसरात हा चर्चेचा विषय ठरले आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : वाढत्या चोऱ्यांमुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दहशत पसरली असताना, अचलपूर तालुक्यातील वडगाव फत्तेपूर येथे युवक संरक्षणासाठी पुढे आले आहेत. दररोज दहा-बारा युवकांची टोळी गावात गस्त घालते. हा अभिनव उपक्रम ग्राम सुरक्षा समितीमार्फत सुरू करण्यात आला. परिसरात हा चर्चेचा विषय ठरले आहे.
परतवाडा-अकोला मार्गावरील वडगाव फत्तेपूर जवळपास पाच हजार लोकसंख्येचे गाव. महामार्गावर असल्याने दिवसरात्र वाहतूस सुरू असते. तरीदेखील परिसरातील शेतकऱ्यांच्या संत्राबागांतील चोरीसह घरफोडीच्या प्रकारामुळे गावकरी हवालदिल झाले होते. परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडगावचे पोलीस पाटील पांडुरंग खडके आणि तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राज मेतकर यांनी गावाची सुरक्षा स्वत:च करण्याचा निर्धार गावातील युवकांपुढे मांडला आणि तेवढ्याच तत्परतेने गावकऱ्यांनी एकसंध होत ग्राम सुरक्षा दलाची स्थापना केली.
पंधरा युवकांचा गट, प्रत्येकाला दिवस नेमून
पोलीस कर्मचाऱ्यांची तोकडी संख्या पाहता पोलिसांना सहकार्य करण्याची संकल्पना तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राज मेतकर यांनी गावकऱ्यांपुढे ठेवली. त्याला दीडशेवर युवकांनी होकार कळवीत आपला सहभाग नोंदविला. आता आठवड्यातील सात दिवसांचे नियोजन आखण्यात आले असून, युवकांच्या सोयीनुसार त्यांचा दहा ते पंधरा जणांचा गट करून प्रत्येकाला दिवस नेमून देण्यात आला.
तोंडात शिटी, हातात बॅटरी अन काठी!
रात्री १२ ते पहाटे ६ या वेळेत गस्त घालणाऱ्या युवकांच्या तोंडात शिटी, तर हातात टार्च आणि काठी घेऊन संपूर्ण गावाची गस्त हे युवक घालतात. काही संशयास्पद आढळल्यास प्रत्येकाजवळ मोबाइल देण्यात आला असून, दिलेल्या क्रमांकावर रात्री कॉल करीत गावकऱ्यांना जागविण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला आहे.
पोलीस पाटील, तंटामुक्ती पदाधिकारी गस्तीवर
गावाची सुरक्षा युवकांच्या हाती देण्यात आली असली तरी पोलीस पाटील पांडुरंग खडके, तंटामुक्ती अध्यक्ष राज मेतकर, रोशन पाली, पोवेश परवाले, संतोष गोरले, निखिल यादव, मनोज कुटे, स्वप्निल खोडे, किशोर बरवट, अमन अतकरे, धनंजय पोफळी, सतीश सिरस्कार, प्रशांत कान्हेरकर, अभिजित कळस्कर, प्रेमानंद गाडगे अशा दीडशेवर युवकांसह ग्रामपंचायत सदस्यांचा या गस्ती पथकात सहभाग आहे.
वडगाव फत्तेपूर येथे प्रथमच ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्यात आले. गावकऱ्यांचा यात सहभाग उल्लेखनीय आहे.
- संजय सोळंके
ठाणेदार, परतवाडा
पोलिसांवर कामाचा ताण पाहता, एक कर्मचारी गस्त घालण्यास अपुरा ठरतो. त्यांना सहकार्य व गावाची सुरक्षा आपल्या हाती घेत सुरक्षा दल स्थापन केले आहे.
- राज मेतकर,
अध्यक्ष, तंटामुक्ती समिती, वडगाव फत्तेपूर