दारुबंदीसाठी रास्ता रोको
By admin | Published: June 20, 2015 12:40 AM2015-06-20T00:40:19+5:302015-06-20T00:40:19+5:30
स्थानिक नवसारी परिसरातील देशी दारु विक्रीचे दुकान कायमस्वरुपी हद्दपार करण्यात यावे,
अमरावती : स्थानिक नवसारी परिसरातील देशी दारु विक्रीचे दुकान कायमस्वरुपी हद्दपार करण्यात यावे, या मागणीसाठी शुक्रवारी नवसारी चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. दारुविक्रीचे दुकान बंद करण्यासाठी महिलांनी दुकानावर हल्लाबोल केला. कुलूप लावून दुकानाचे मुख्य दार बंद केले. यावेळी दारुबंदीसाठी जोरदार नारेबाजी करण्यात आली. त्यानंतर महिलांनी मोर्चा रास्ता रोको आंदोलनाकडे वळविला. मात्र, पोलिसांच्या समय सूचकतेने आंदोलन शांततेत पार पडले.
रिपाइंचे अमोल इंगळे, संजय गायकवाड, सविता भटकर यांच्या नेतृत्त्वात दारुबंदीचे आंदोलन करण्यात आले. नवसारी येथील देशी दारुविक्रीचे दुकान कायमस्वरुपी हद्दपार करण्यात यावे, यासाठी मागील काही महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे. यापूर्वी नवसारी परिसरातील महिलांनी पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार सुनील देशमुख, जिल्हाधिकारी किरण गित्ते, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक उषा वर्मा आदींना निवेदन सादर करुन हे परिसरातून दुकान हटविण्याची मागणी करण्यात आली आहे. देशी दारुविक्रीचे दुकान हे नवसारी ते प्रवीणनगर मुख्य मार्गावर असल्याने ये- जा करताना दारुड्यांचा प्रचंड त्रास असल्याची गाऱ्हाणी महिलांनी मांडली. सततच्या दारु सेवनाने अनेकांना मृत्यूने कवटाळले असून महिलांचे कुंकू पुसले गेले आहेत. नवसारी येथील झोपडपट्टीत मोठ्या प्रमाणात पुरुषांमध्ये दारु प्राशन करण्याचे प्रमाण वाढल्याची कैफियत महिलांची आहे.
दारुमुळे संसारात सतत वाद, भांडण होत असून गरीब, सामान्य कुटुंबातील मुला-बाळांच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण झाल्याच्या तक्रारी या परिसरातील महिलांच्या आहेत. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी देऊनही दखल घेत नसल्याने महिलांनी शुक्रवारी या दारु विक्रीच्या दुकानावर हल्लाबोल केला. दुकानासमोर जोरदार नारेबाजी करीत देशी दारु बंद दुकान करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी दुकानदारासोबत आंदोलकांचा वादही झाला. काही वेळाने घटनास्थळी पोलीस पोहोचले. त्यानंतर आंदोलक महिलांनी रास्ता रोको आंदोलन करण्यासाठी आगेकूच केली. मात्र, वलगाव मार्गावर नवसारी चौकात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याने मोर्चेकऱ्यांना रास्ता रोको आंदोलन करण्यापूर्वीच पोलिसांनी अटक करुन वाहनात बसविण्याची खेळी रचली. परंतु महिला आंदोलकांनी पोलिसांची ही खेळी धुडकावीत रस्त्यावर येऊन रास्ता रोको आंदोलन करुन दारुबंदीचा आवाज बुलंद केला.
यावेळी प्रशासनाच्या विरोधात नारेबाजी करीत दारुविक्रीचे दुकान कायमस्वरूपी हद्दपार करण्याची मागणी केली. यावेळी आंदोलनात अमोल इंगळे, मानेज भोयर, सविता भटकर, उमेश सरदार, संजय गायकवाड, आशिष इंगळे, कल्पना सहारे, राजकन्या तानोडे, भीमराव वानखडे, छाया गायकवाड, सुनंदा किर्तकार, उषा पाटील, सुनील भोयर, आतिश डोंगरे, आकाश अवचड, आकाश किर्तकार, शुभम थोरात, आशा मोहोड, पार्वती परवले, जिजाबाई मनोहरे आदी उपस्थित होते.
पोलिसांनी पाच मिनिटांतच गुंडाळले आंदोलन
नवसारीत दारुबंदीसाठी रस्ता रोको आंदोलन करण्याचे ठरविले असताना गाडगेनगर पोलिसांनी काही आंदोलनकांना हाताशी धरुन हे आंदोलन अवघ्या पाच मिनिटांतच गुंडाळून टाकले. रास्ता रोको आंदोलनासाठी महिला रस्त्यावर नारेबाजी देत असताना पाच मिनिटांतच पोलिसांनी आंदोलक महिलांना रस्त्यावरुन बाजूला केले. कोणतेही वाहन न थांबविता रास्ता रोको आंदोलन झाल्यामुळे काही महिलांनी आयोजकांवर प्रचंड नाराजी व्यक्त केली.
१५ ते २० जणांना अटक
आंदोलनात सहभागी १५ ते २० महिला, पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कालांतराने या आंदोलकांना पोलिसांनी अटक करुन सुटकादेखील केली. मात्र, पाच मिनिटांतच कोणतेही वाहन न रोखता झालेल्या रास्ता आंदोलनामुळे नवसारीत महिलांमध्ये नाराजीचा सूर पहावयास मिळाला. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात असल्याने अनेक आंदोलकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
प्रतिकात्मक कुलूप ठोकले
आंदोलनकर्त्यांनी या दारूदुकानाच्या मेन गेटला ‘प्रतिकात्मक’ कुलूप ठोकले. आंदोलनकर्त्यांचा रोष प्रचंड होता. गेटवर लावलेले पहिले कुलूप न उघडता आंदोलनकर्त्यांनी प्रतिकात्मक कुलूप लावून निषेध व्यक्त केला. यावेळी महिलांनी नारेबाजीदेखील केली.