नवलच! अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्याला मिळाले एका नोंदणीवर दोन आधार कार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 08:02 PM2018-01-08T20:02:05+5:302018-01-08T20:04:39+5:30
मोर्शी तालुक्यातील अंबाडा येथील विद्यार्थ्याला दोन वेगवेगळ्या क्रमांकाचे आधार कार्ड घरपोच मिळाले आहेत. आधारसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी ‘युनिक’ असताना, हा प्रकार उघड झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गोपाल डाहाके
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मोर्शी तालुक्यातील अंबाडा येथील विद्यार्थ्याला दोन वेगवेगळ्या क्रमांकाचे आधार कार्ड घरपोच मिळाले आहेत. आधारसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी ‘युनिक’ असताना, हा प्रकार उघड झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मोर्शी तालुका मुख्यालयापासून १२ किमी अंतरावरील अंबाडा येथे संचित वासुदेव वानखडे या सहा वर्षाच्या मुलाच्या घरी त्याचे वेगवेगळ्या क्रमांकाचे दोन आधार कार्ड पोहोचले आहेत. पहिल्या आधारवर ५७१७ ६०३४ ७२९१ हा क्रमांक आहे, तर दुसऱ्या आधारवर ७६५० ३८२६ २०६९ असा क्रमांक नमूद आहे. यामुळे शासकीय कामात कोणते आधार कार्ड वापरावे, असा प्रश्न त्याच्या पालकांना पडला आहे.
नोंदणी एकदाच
संचितची ३१ आॅगस्ट २०१६ रोजी मोर्शी येथील आठवडी बाजार परिसरातील सेतू केंद्रात आधार कार्डसाठी नोंदणी केली होती. बोटांचे ठसे, डोळ्यांचा रेटिना व अन्य आवश्यक माहिती केवळ एकदाच नोंदविण्यात आली. यावेळी त्याच्यासोबत आईवडील होते.
नामांकन दोनदा
आधारसाठी नोंदणी करतेवेळी दोनवेळा नामांकन प्राप्त झाले. पहिले नामांकन क्रमांक २०३४/३०५२३/००८६८, तर दुसरे २०३४/३०५२३/००८६७ असे होते. आधार कार्ड एकच मिळेल, असे सांगितले गेल्याने संचिंतच्या पालकांनी फारसे मनावर घेतले नाही. यानंतर मुलाचे दोन कार्ड घरी आले.
स्कॉलरशिप, बँक खाते नाही
संचित अंबाडा येथील जिल्हा परिषद शाळेत पहिल्या वर्गाचा विद्यार्थी आहे. त्याच्या पालकांनी अनुसूचित जाती प्रवर्गातील शिष्यवृत्तीकरिता अर्ज केला. मात्र, त्याचे दोन्ही आधार क्रमांक बायोमेट्रिक पद्धतीने लिंक होत नाहीत. बँक खातेदेखील ते ऊघडू शकले नाही.
एनआयसीने ठरवून दिलेल्या आधार केंद्राला मदत करणे, जास्तीत जास्त आधार कार्ड बनविणे व देखरेख ठेवणे ही कामे आमच्याकडे आहेत. तांत्रिकदृष्ट्या बायोमेट्रिकबद्दल माहिती आमच्याकडे नाही; जिल्हास्तरावरून ती माहिती मिळू शकेल.
- अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार, मोर्शी