मतदान करून लोकशाहीला बळकट करा, शंकरबाबा पापळकर यांचे सर्व दिव्यांग मतदारांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 04:17 PM2024-11-07T16:17:15+5:302024-11-07T16:19:21+5:30
सहायक नोडल अधिकारी पंकज जी. मुदगल व नीरज तिवारी यांनी शंकरबाबांची वझर येथे भेट घेत सर्व मतदारांना मतदानाकरिता प्रेरित करण्याकरिता मार्गदर्शन व आवाहन करण्याची विनंती केली होती.
अमरावती : विधानसभा निवडणुकीत सर्व दिव्यांगांनी कर्तव्यभावना म्हणून व लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांनी बुधवारी केले. सहायक नोडल अधिकारी पंकज जी. मुदगल व नीरज तिवारी यांनी शंकरबाबांची वझर येथे भेट घेत सर्व मतदारांना मतदानाकरिता प्रेरित करण्याकरिता मार्गदर्शन व आवाहन करण्याची विनंती केली होती.
ते माझे कर्तव्य आहे, मी नक्कीच दिव्यांगांना मतदानाकरिता प्रेरित करेन व लोकशाही बळकट करण्याकरिता आपले शक्य तेवढे योगदान देईल, असे विचार मांडले. जिल्ह्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व दिव्यांगांनी अवश्य मतदान करावे, असे आवाहन सर्व मतदारांना व दिव्यांगांना केले. त्याचबरोबर पीडब्ल्यूडी अंतर्गत जिल्ह्यात होत असलेल्या कार्याचे बाबांनी कौतुक केले.
आयोगाच्या दिशानिर्देशानुसार दिव्यांग मतदारांचा मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी पीडब्ल्यूडी स्वतंत्र नोडल अधिकारी म्हणून जया राऊत, सहायक नोडल अधिकारी राजेंद्र जाधवर, डी. एम. पुंड, पी. डी. शिंदे, पवन साबळे, भारत राऊत, शालिनी गायबोले, उमेश धुमाळे, आशिष चुनळे, पंकज मुदगल व नीरज तिवारी यांची नियुक्ती केली आहे.
दिव्यांग मतदारांसाठी कार्यशाळा उपयुक्त
ईव्हीएम प्रात्यक्षिक कार्यशाळा अतिशय फायदेशीर आहेत. यामुळे दिव्यांग मतदाराला ईव्हीएम मशीनवर आपले मत कसे नोंदवायचे हे कळते व तो स्वतंत्रपणे मतदान करू शकतो, ज्यामुळे मतदानाची गोपनीयता राखता येते, असे मत बाबांनी व्यक्त केले. याबाबत होणाऱ्या कार्यशाळेस सर्व दिव्यांगांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शंकरबाबांनी केले आहे.
गांधारी म्हणाली, मी करणार मतदान
या भेटीवेळी शंकरबाबांची मानसकन्या गांधारीसुद्धा उपस्थित होती. तिनेसुद्धा जिल्ह्यातील मतदारांना मतदान करण्याबाबत आवाहन केले. ती म्हणाली, ‘मी दिव्यांग असून येत्या २० नोव्हेंबरला मतदान करणार आहे, आपणही जरूर मतदान करावे व लोकशाहीला बळकट करावे.’ असे आवाहन केले.