अहवालाअंती कोचिंग क्लासेसवर कठोर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 11:23 PM2019-06-03T23:23:07+5:302019-06-03T23:23:29+5:30

एज्युकेशन हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती शहरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. खासगी कोचिंग क्लासच्या नोंदणीत हयगय व सुरक्षिततेच्या मानकांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही. या विषयात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी सोमवारी दिले. आयुक्तांनी सोमवारी सकाळी या विषयाच्या अनुषंगाने बैठक घेतली व समिती सदस्यांना पुन्हा सूचना देऊन तत्काळ अहवाल मागितला आहे.

Strict action against the coaching classes | अहवालाअंती कोचिंग क्लासेसवर कठोर कारवाई

अहवालाअंती कोचिंग क्लासेसवर कठोर कारवाई

Next
ठळक मुद्देमहापालिका आयुक्तांची तंबी : सुरक्षेत हयगय खपविणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : एज्युकेशन हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती शहरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. खासगी कोचिंग क्लासच्या नोंदणीत हयगय व सुरक्षिततेच्या मानकांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही. या विषयात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी सोमवारी दिले.
आयुक्तांनी सोमवारी सकाळी या विषयाच्या अनुषंगाने बैठक घेतली व समिती सदस्यांना पुन्हा सूचना देऊन तत्काळ अहवाल मागितला आहे.
गुजरात राज्यातील सरथाना येथील चार मजली इमारतीला लागलेल्या आगीत २१ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अमरावती शहरात सुरू असलेल्या खासगी शिकवणी वर्गात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्या उपाययोजना केल्या, हा प्रश्न प्रामुख्याने समोर आला. शहरात दीडशेवर खासगी कोचिंग क्लासेस आहेत. लाखो रुपये शुल्क आकारणी केली जाते. तथापि, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोणातून कुठल्याही उपाययोजना नाहीत. आयुक्तांनी हा विषय गांभीर्याने घेतला व शहरातील सर्व खासगी शिकवणी वर्गांच्या तपासणीचे आदेश २६ मे रोजी दिले होते. या आदेशाच्या अनुषंगाने सहआयुक्त (मुख्यालय), सहायक आयुक्त (बाजार व परवाना), नगर रचनाकार, शिक्षणाधिकारी, अतिक्रमण निर्मूलन पथकप्रमुख, अग्निशमन अधीक्षक या सहा समिती सदस्यांना शिकवणी वर्गात नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचेच निदर्शनात आले. महापालिकेच्या बाजार व परवाना विभागात फक्त १७ क्लास नोंदविल्याचे आढळून आले. महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक आणि जीवन सुरक्षा उपाययोजना अधिनियम २००६ च्या अनुषंगानेही उपाययोजना या ठिकाणी नसल्याचे समिती सदस्यांच्या निदर्शनात आले. त्यामुळे कोचिंग क्लासेसना नोटीस बजावण्यात आल्यात.
खासगी शिकवणी अधिनियम केव्हा?
खासगी शिकवणी वर्गांवर नियंत्रण मिळविण्यासाठी महाराष्ट्र खासगी शिकवणी (विनियमन) अधिनियम २०१८ चा मसुदा मागील वर्षी तयार करण्यात आला. सुरत येथील दुर्घटनेच्या अनुषंगाने आगामी अधिवेशनात हा मसुदा आल्यास याचे कायद्यात रूपांतर होऊ शकते. शिक्षण आयुक्तांच्या १२ सदस्यीय समितीने हा मसुदा तयार केला आहे. यामध्ये विद्यार्थिसंख्या, शुल्काची आकारणी, अग्निरोधक यंत्रणा यांसह विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक बाबींचा समावेश आहे. अनेक राज्यांमध्ये याविषयीचे कायदे असताना, महाराष्ट्रात याविषयीचा अधिनियम केव्हा, असा पालकांचा सवाल आहे.
या बाबींना आवर हवा
खासगी शिकवणी वर्गाची महापालिकेच्या बाजार व परवाना विभाग किंवा अन्य कुठल्याच यंत्रणेकडे नोंदणी नाही. या क्लासेसमध्ये मनमानी शुल्क आकारणी केली जाते. हे शिकवणी वर्ग कुठल्याही जागेत घेतल्या जातात. विद्यार्थिसंख्येला आवर नसल्याने ते कोंडवाडे झाले आहेत. पार्किंग सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांनाही त्रास होतो. येण्या-जाण्याचे दोन मार्ग नाहीत; एकमेव मार्गदेखील प्रशस्त नाही. आपत्कालीन स्थितीत अग्निरोधक यंत्रणा किंवा इतर सुरक्षाविषयक निकषांचा अभाव आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने फायर आॅडिट झालेले नाही.

शहरातील खासगी कोचिंग क्लासेसच्या बेपर्वा धोरणाला पायबंद घालण्यासाठी समिती पाहणी करीत आहे. एक- दोन दिवसांत अहवाल मिळताच या नियमबाह्य वर्गांवर कठोर कारवाई केली जाईल.
- संजय निपाणे, आयुक्त, महापालिका

Web Title: Strict action against the coaching classes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.